माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची संस्था ‘प्रणब मुखर्जी फाऊंडेशन’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये हरयाणात काही समाजिक प्रकल्पांवर एकत्र काम करीत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. हे वृत्त मुखर्जी यांनी खोडून काढले असून संघासोबत आपण कोणत्याही प्रकल्पावर काम करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी हरयाणातील गुरुग्राम येथे मुखर्जी यांच्या हस्ते स्मार्टग्राम योजनेंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केला. यापूर्वीही त्यांनी ट्विटरच्या माध्यमांतून हा दावा नाकारला होता. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासोबत हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे देखील उपस्थित होते.


स्मार्टग्राम योजनेंतर्गत मुखर्जी यांनी दोन वर्षांपूर्वी अलिपूर, दाऊला, हरचंदपूर, ताजपूर आणि मेवत येथील गावांना दत्तक घेतले असून या गावांमधील नागरिकांसाठी त्यांनी परवडणाऱ्या आणि चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी काही माध्यमांनी वृत्त दिले होते की, माजी राष्ट्रपतींची प्रणब मुखर्जी फाऊंडेशन आणि रा. स्व. संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने हरयाणात विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुखर्जी यांनी संघाच्या काही कनिष्ठ आणि वरिष्ठ स्वयंसेवकांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले आहे.


मात्र, त्याचदिवशी प्रणब मुखर्जी यांच्या कार्यालयाने हे वृ्त्त नाकारत यावर स्पष्टीकरण दिले होते. त्यात मुखर्जींच्यावतीने म्हटले होते की, मी हरयाणा सरकारच्या आमंत्रणामुळे रविवारच्या उद्घाटन कार्यक्रमाला जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी कामाला सुरुवात झालेल्या या विविध प्रकल्पांची उद्घाटने रविवारी येथे होणार आहेत. त्यामुळे संघाशी आपले कसलेही सहकार्य संबंध नसून असे कुठल्याही प्रकल्पावर आम्ही एकत्रितरित्या काम करीत नाही, असेही त्यांनी या परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले होते.

याच वर्षी जून महिन्यांत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी संघाच्या नागपूर येथील शिबिराला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि संघाच्या विविध पदाधिकाऱ्यांसोबत व्यासपीठावर हजेरी लावली होती. दरम्यान, त्यांनी संघाचे आमंत्रण स्विकारल्यावरुन त्यांना काँग्रेससह त्यांची मुलगी शर्मिष्ठा यांनी पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला होता.