माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी तसेच दिवंगत समाजसेवक नानाजी देशमुख आणि दिवंगत संगीतकार भूपेन हजारिका यांना शुक्रवारी ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला.

२०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूवरेत्तर आणि ईशान्य भारतावर भारतीय जनता पक्ष विशेष भर देत आहे. त्याच धोरणाचे प्रतिबिंब या ‘भारतरत्न’च्या निवडीत पडले आहे.

काँग्रेसमध्ये प्रियंका गांधी यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला असतानाच घराणेशाहीचा आरोप सत्तावर्तुळातून सुरू आहे. त्या आरोपाची धार मुखर्जी यांच्या निमित्ताने अधिक तीव्र केली जाण्याची शक्यता आहे. मुखर्जी यांच्यावर काँग्रेसने नेहमीच अन्याय केल्याचे वक्तव्य भाजप नेत्यांनी जाहीरपणे केले आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातही मुखर्जी यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करून भाजपने त्यांच्याशी जवळीकीचा आभास निर्माण केला आहेच. या पाश्र्वभूमीवर या पुरस्काराने पुढचे पाऊल टाकल्याची चर्चा आहे.

हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे जन्मलेले नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले ज्येष्ठ नेते होते. जनसंघाचे नेते असलेले नानाजी हे राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांनी आणीबाणीत उजव्या आणि डाव्या पक्षांना समान राजकीय कार्यक्रम देण्यात आणि इंदिरा गांधींविरोधात संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जनता सरकारचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतर मात्र राजकारणातून बाहेर पडून त्यांनी ग्रामीण  भारत स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी स्वत:ला झोकून दिले. चित्रकूट येथे त्यांनी भारतीय संस्कृती आणि शिक्षण या बाबतीत मोठे कार्य केले होते. २०१०मध्ये वयाच्या ९५व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते.

भूपेन हजारिका यांनी आसामात चित्रपट संगीतकार, गायक, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून विपुल कार्य केले. आसामीबरोबरच हिंदी आणि बंगाली चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते.

चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च अशा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने तसेच पद्म किताबानेही त्यांचा गौरव झाला होता. ‘इप्टा’पासून कलाजीवनाचा प्रारंभ केलेले हजारिका अनेक सामाजिक आंदोलनातही सहभागी होते. २०११साली वयाच्या ८५व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले होते.

मोदींच्या शब्दात..

  • प्रणबदा हे प्रगल्भ नेते आहेत. त्यांनी अनेक दशके देशाची नि:स्वार्थ सेवा केली आहे. त्यांच्या तोडीची बुद्धीमत्ता असलेले फार कमी नेते आहेत. त्यांना भारतरत्न दिले जात आहे, याचा आनंद वाटतो.
  • ग्रामीण विकासासाठी नानाजी देशमुख यांनी केलेल्या कार्याने ग्रामीण उत्थानाचा नवा मार्ग प्रकाशित केला. तळागाळातील लोकांच्या सेवेत तनमन वेचलेले नानाजी हे खरे भारतरत्नच आहेत.
  • भूपेन हजारिका यांच्या संगीताने अनेक पिढय़ांना तोषविले आहे. त्यांनी भारतीय संगीत जगविख्यात केले. भूपेनदा यांना भारतरत्नने गौरविले जात आहे, याचा आनंद वाटतो.