02 March 2021

News Flash

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा ८ ऑगस्ट रोजी भारतरत्न किताबाने होणार गौरव

या किताबासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. भारतरत्नने आजवर ४५ जणांना सन्मानित करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : प्रणव मुखर्जी, दिवगंत नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना येत्या ८ ऑगस्ट रोजी भारतरत्न किताबाने गौरविण्यात येणार आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना येत्या ८ ऑगस्ट रोजी देशाचा सर्वोच्च नागरी किताब भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आसामचे दिवंगत प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात येणार आहे. या किताबासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. भारतरत्नने आजवर ४५ जणांना सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या किताबाने सन्मानित करण्यात आले होते.

प्रणव मुखर्जी यांच्या नावाची भारतरत्नसाठी घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. दरम्यान, हजारिका आणि देशमुख यांच्यासह १२ जणांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात आले आहे. सुरुवातीला भारतरत्न मरणोत्तर देण्याची तरतूद नव्हती. मात्र, त्यानंतर १९५५ पासून मरणोत्तरही या सन्मानाने सन्मानित केले जाऊ लागले.

हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे जन्मलेले नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले ज्येष्ठ नेते होते. जनसंघाचे नेते असलेले नानाजी हे राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांनी आणीबाणीत उजव्या आणि डाव्या पक्षांना समान राजकीय कार्यक्रम देण्यात आणि इंदिरा गांधींविरोधात संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जनता सरकारचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतर मात्र राजकारणातून बाहेर पडून त्यांनी ग्रामीण भारत स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी स्वत:ला झोकून दिले. चित्रकूट येथे त्यांनी भारतीय संस्कृती आणि शिक्षण या बाबतीत मोठे कार्य केले होते. २०१० मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

तसेच भूपेन हजारिका यांनी आसामात चित्रपट संगीतकार, गायक, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून विपुल कार्य केले. आसामीबरोबरच हिंदी आणि बंगाली चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते. चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च अशा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने तसेच पद्म किताबानेही त्यांचा गौरव झाला होता. ‘इप्टा’पासून कलाजीवनाचा प्रारंभ केलेले हजारिका अनेक सामाजिक आंदोलनातही सहभागी होते. २०११ साली वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 9:15 am

Web Title: pranab mukherjee nanaji deshmukh bhupen hazarika will be honored by bharat ratna on august 8 aau 85
Next Stories
1 काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनी दहशतवादी हल्ल्याचा कट?
2 भाजपच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक
3 ‘मिनी माऊस’चा आवाज हरपला
Just Now!
X