माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी आज ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अभिजित मुखर्जी यांनी २०१२ आणि २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर बंगालमधील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि जिंकली होती. २०१९ मध्येही काँग्रेसने त्यांना या जागेवरुन तिकीट दिले पण त्यांचा पराभव झाला होता.

ममता बॅनर्जी यांनी ज्या प्रकारे भाजपाच्या जातीय हिंसाचाराच्या लाटेला रोखले, मला विश्वास आहे की भविष्यात इतरांच्या पाठिंब्याने त्या संपूर्ण देशात अशीच कामगिरी करू शकतील असे अभिजीत मुखर्जी यांनी म्हटले.

प्राथमिक सभासद वगळता मला काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही गटामध्ये सामील केले नव्हते. म्हणून मी टीएमसीमध्ये सैनिक म्हणून रुजू झालो आहे आणि पक्षाच्या सूचनांनुसार काम करेन. अखंडता आणि धर्मनिरपेक्षता राखण्यासाठी मी काम करेन असे अभिजित मुखर्जी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरेच नेते टीएमसीमध्ये सामील होत आहेत. नुकतेच मुकुल रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. आता अभिजित मुखर्जीही तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत.

बनावट लसीकरण प्रकरणात अभिजीत बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यांनी ट्विट करत “कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या चुकीच्या कृतीसाठी पश्चिम बंगाल आणि ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरणे योग्य नाही. जर तसे असेल तर मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्या खटल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही जबाबदार धरता येईल,” असे म्हटले होते.