माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त आहे. फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या आर्मीच्या रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलने सोमवारी मेडिकल बुलेटिनदरम्यान सांगितले. त्यामुळे मुखर्जी हे अद्यापही दीर्घ कोमात असून व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत.

“कालपासून मुखर्जी यांची प्रकृती खालावत आहे. फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने ते सध्या सेप्टिक शॉकमध्ये आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, मुखर्जी अद्यापही दीर्घ कोमात असून व्हेटिंलेटर सपोर्टवर आहेत,” अशी माहिती रिसर्च अॅण्ड रेफरल हॉस्पिटलने दिली आहे.

राजाजी मार्ग येथील घरी घसरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे ८४ वर्षीय मुखर्जी यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाली होती. ही गाठ काढण्यासाठी त्यांच्यावर मेंदू शस्त्रक्रियाही करण्यात आली. तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.

२१ ऑगस्ट रोजी माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट करुन वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. तसेच मुखर्जी यांच्या प्रकृतीच्या सुधारणेसाठी सर्वांनी दिलेल्या सदिच्छा आणि प्रार्थनेसाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती. भारतरत्न लता मंगेशकर यांनी देखील आपल्याला फोन करुन वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.