दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं ‘द प्रेसिडेंशियल इयर्स’ हे अखेरचं पुस्तक लवकरच रूपा पब्लिकेशन हाऊसकडून प्रकाशित करण्यात येणार आहे. परंतु या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या घोषणेनंतर प्रणव मुखर्जींचे सुपुत्र अभिजित मुखर्जी आणि प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांच्यातील वाद समोर आले आहेत. दरम्यान, अभिजित मुखर्जी यांनी या पुस्तकाचं प्रकाशन थांबवण्याची मागणी केली आहे. यातील माहिती पाहून त्याबाबत मंजुरी दिल्यावर ते छापण्यास त्यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी या पुस्तकाला प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिल्याचं सांगत साध्या लोकप्रियतेपासून वाचण्याचा सल्लाही अभिजित यांना दिला आहे.

पुस्तकातील प्रकाशित करण्यात आलेला काही भाग ‘मोटिवेटेड’ होता आणि प्रणव मुखर्जी यांनी त्याला मंजुरी दिली नसेल, असं अभिजित मुखर्जी म्हणाले. तसंच त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन थांबवण्याची मागणी केली. “माझे वडील आता हयात नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा म्हणून मी पुस्तकाचं अंतिम माहिती पाहू इच्छितो. माझे वडील आता असते तर त्यांनीदेखील तेच केलं असतं,” असं अभिजित मुखर्जी म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून प्रकाशक कपीश मेहरा यांना टॅग करत ही माहिती दिली.

“मी जोवर या पुस्तकातील माहितीला मंजुरी देत नाही आणि लिखित स्वरूपात सहमती देत नाही तोवर तुम्ही या पुस्तकाचं प्रकाशन थांबवा. मी यापूर्वी तुम्हाला यासंदर्भातील एक पत्र पाठवलं आहे. ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल,” असंही ते म्हणाले.

प्रणव मुखर्जींची मंजुरी

हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भात प्रकाशकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. परंतु प्रणव मुखर्जी यांनी न केवळ अंतिम मसुद्याला मंजुरी दिली होती, तर रुग्णालयात दाखल होण्याच्या एका दिवसापूर्वी त्यांनी या पुस्तकाच्या कव्हरलाही मंजुरी दिली असल्याचं एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. “२०१३ मध्ये त्यांच्यासोबत पहिला करार करण्यात आला होता आणि २०१८ मध्ये त्यांनी आपल्या नव्या पुस्तकाच्या करारावर स्वाक्षरी केली होती. परंतु त्यावेळी अभिजित मुखर्जी नव्हते,” असंही त्यांनी सांगितलं.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबत काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यानं हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाला मंजुरी दिली होती. दरम्यान शर्मिष्ठा मुखर्जी यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाबी. आपले भाऊ अभिजित मुखर्जी यांच्या ट्वीटला काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी उत्तर दिलं.

“मी पुस्तकाच्या लेखकांची मुलगी म्हणून माझे बंधू अभिजित मुखर्जी यांना वडिलांनी लिहिलेल्या अखेरच्या पुस्तकाच्या प्रकाशनात अनावश्यक अडचण न आणण्याची विनंती करत आहे. आजारी पडण्यापूर्वीच त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलं होतं,” असंही त्या म्हणाल्या. “पुस्तकासोबतच माझ्या वडिलांनी हातानं लिहिलेली माहितीदेखील आहे आणि त्या जशाच्या तशा घेण्यात आल्या आहे. त्यांच्याद्वारे व्यक्त करण्यात आलेले विचार हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत. त्यामुळे या पुस्तकाचं प्रकाशन थांबवण्याचे प्रयत्न करू नये. हा आपल्या वडिलांवरील मोठा अन्याय असेल,” असंही त्या म्हणाल्या.