अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकांचे वारे वाहत आहे. महिनाभराहून कमी दिवसांवर येऊन ठेपलेल्या अध्यक्षीय निवडणुकांतील पहिली जाहीर चर्चा अमेरिकेत मंगळवारी (२९ सप्टेंबर) (भारतीय वेळेनुसार बुधवारी) झडली. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या दुसऱ्या खेपेस आव्हान देऊ पाहणारे डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्यात अमेरिकी प्रचारप्रथेनुसार ही चर्चा झाली.  सुमारे दीड तासाच्या या चर्चेमध्ये ट्रम्प यांनी ‘‘मी जे काही ४७ महिन्यांत करून दाखवले ते विरोधक ४७ वर्षांत साध्य करू शकले नाहीत’’, ‘‘देशाच्या इतिहासातले हे सर्वोत्तम सरकार आहे’’, ‘‘देश सध्याइतका आर्थिकदृष्टय़ा समर्थ कधीही नव्हता,’’  अशी सर्व विधाने ट्रम्प यांनी या चर्चासत्रामध्ये केली. यावरुनच आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्रम्प यांना बेरोजगारीवरुन टोला लगावला आहे. मात्र त्याचवेळी भूषण यांनी अप्रत्यक्षपणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चिमटा काढला आहे.

प्रशांत भूषण यांनी एक स्तंभालेख शेअर केला असून यामध्ये ट्रम्प हे अध्यक्ष असतानाच चार मिलियन नोकऱ्या गेल्याचे दिसून येत आहे. अमेरिकच्या इतिहासातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षाच्या काळामध्ये एवढ्या नोकऱ्या गेलेल्या नाहीत असं यामध्ये दिसत आहे. “ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये ४ मिलियन जणांनी नोकऱ्या गमावल्या. तर ओबामांच्या कालावधीमध्ये १२ मिलियन जणांना रोजगार मिळाला. तरी ट्रम्प हे आपण अर्थव्यवस्थेला रुळावर आणल्याचा दावा करतात. ते खरोखरच जुमलेबाज आहेत. तुम्हाला ठाऊकच असेल कोणासारखे,” अशी कॅप्शन भूषण यांनी या फोटोला दिली आहे. प्रशांत भूषण यांनी शेअर केलेली माहिती ही फेड्रल रिझर्व्ह बँक ऑफ सेंट लुईसच्या आकडेवारीवर आधारित असल्याचे फोटोमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या फोटोमध्ये अमेरिकेच्या माजी १२ राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळामध्ये किती रोजगार उपलब्ध झाले यासंदर्भातील माहिती देण्यात आलीय.

जुमला शब्द आधी अमित शाह यांनी वापरलेला

२०१४ साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने लोकसभा निवडणुका जिंकल्या आणि मोदी पंतप्रधान झाले. त्यानंतर २०१५ साली एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदा जुमला या शब्दाचा वापर केला होता. परदेशातील काळापैसा भारतात आणला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करता येतील हा निवडणुकीच्या प्रचारामधील जुमला म्हणजेच खोटं आश्वासन होतं असं शाह यांनी ५ फेब्रुवारी २०१५ रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर विरोधकांनी अनेकदा यावरुन भाजपावर टीका केल्याचे पाहायला मिळालं आहे.