पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्यांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. मात्र आता या आंदोलकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपा विरुद्ध भाजपाविरोधक अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. सत्ताधारी नेते या आंदोलनासाठी विरोधी पक्षांना जबाबदार धरत आहेत, तर विरोधी पक्षातील नेतेमंडळी कायदे मागे घेण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देताना दिसत आहेत. भाजपा नेत्या बबिता फोगाटने शेतकरी आंदोलन हे तुकडे तुकडे गँगने हायजॅक केल्याचं ट्विट केलं होतं. यावरुनच आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी भाजपाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे.

नक्की पाहा >> मोदी सरकारच्या काळात अदानींच्या २१ कंपन्यांना मंजूरी; जाणून घ्या Adani Agri Logistics आहे तरी काय?

प्रशांत भूषण यांनी ट्विटरवरुन शेतकरी आंदोलनाला आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांना तुकडे-तुकडे गँग म्हणणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. “अदानी आणि अंबानींच्या तुकड्यांवर जगाणारे लोकं आज आपल्या शेतकऱ्यांना तुकडे तुकडे गँग म्हणत आहेत,” असं ट्विट प्रशांत भूषण यांनी केलं आहे.

नक्की वाचा >> “अंबानींना टेलीकॉम, अदानींना एअरपोर्ट्स अन् शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदी है तो मुमकीन है”

तर अन्य एका ट्विटमधून प्रशांत भूषण यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. “आता मोदी चौकीदार आहेत हे मान्यच करावं लागेल. प्रश्न फक्त इतका आहे की ते चौकीदारी कोणाची करतात. अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची?”, असा टोला प्रशांत यांनी ट्विटमधून लगावला आहे.

नक्की वाचा >> “शेतकऱ्यांनाही मोदी, शाह यांच्यासारखे मध्यस्थ नकोय ते थेट अंबानी, अदानींशी बोलतील”

बबिता नक्की काय म्हणाली होती?

बबिता फोगाट हिने ऑगस्ट २०१९मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ती विविध राजकीय मुद्द्यांवर सातत्याने मतप्रदर्शन करताना दिसली आहे. बबिता फोगाटने हे आंदोलन तुकडे-तुकडे गँगने हायजॅक केल्याचे वादग्रस्त ट्विट केलं आहे. “आता असं वाटू लागलंय की शेतकरी आंदोलन हे तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं आहे. मी सगळ्या शेतकरी बांधवांना हाथ जोडून विनंती करते की त्यांनी कृपया आपापल्या घरी परत जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही शेतकऱ्यांचे हक्क डावलणार नाहीत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांतील नेतेमंडळी कधीही शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाहीत”, असे ट्विट तिने केलं आहे.

बादल म्हणतात भाजपाच खरी तुकडे तुकडे गँग

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनीही याच तुकडे तुकडे गँगच्या वक्तव्यावरुन भाजपावर निशाणा साधला.  “भाजपाच देशातील खरी तुकडे तुकडे गँग आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच शेतकरी आंदोलादरम्यान देशाला तोडण्याचं काम त्यांनी केलं असल्याचंही बादल म्हणाले आहेत. “भाजपानं राष्ट्रीय एकतेला तुकड्यांमध्ये तोडलं आहे. त्यांनी हिंदूंना मुस्लीमांविरोधात भडकावलं आहे. आता ते शिख बांधवांबद्दलही तसंच करत आहेत. देशभक्ती असलेल्या पंजाबला भाजपा सांप्रदायिकतेच्या आगीत ढकलत आहे,” असंही बादल यांनी नमूद केलं.

नक्की वाचा >> “…तर शेतकऱ्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं”; आंदोलकांबद्दल केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

“आपण जय जवान जय किसान असं म्हणतो. आज जवानही आंदोलनात सहभागी झाले आहेत आणि शेतकरीही. तुम्हाला नक्की काय हवं आहे? भाजपा सरकारनं आपल्या अहंकारातून मागे हटून शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे,” असंही बादल यांनी म्हटलं आहे. ज्यांनी नवा कायदा तयार केला त्यांनी आयुष्यात कधी शेती केली नाही. केंद्रातील मोदी सरकार हे अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालत आहे. मोदी सरकार लोकांना धर्माच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.