अमित शहांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल गेल्या वर्षभरात तब्बल १६ हजार पटींनी वाढल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे. या संकेतस्थळाविरोधात जय शहांकडून १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जय शहांच्याविरोधात ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण मैदानात उतरले आहेत. जय शहांच्या कंपनीच्या उलाढालीत एका वर्षात प्रचंड मोठी वाढ झाल्याचे वृत्त ‘द वायर’ या संकेतस्थळाने दिले होते.

जय शाह यांच्या कंपनीच्या वाढलेल्या उलाढालीवर लिहिण्यात आलेल्या लेखाचे लेखक, ‘द वायर’चे संपादक आणि मालक यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काल बोलताना स्पष्ट केले होते. या प्रकरणात ‘द वायर’ची बाजू मांडण्याचे काम प्रशांत भूषण करणार आहेत. याबद्दलची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे. अॅग्री बिझनेस/ स्टॉक ट्रेडिंग/ विंड बिझनेसच्या माध्यमातून ‘गतवर्षी केवळ ५० हजार रुपये असलेला नफा यंदा ८० कोटींवर नेणाऱ्या जय शहांची न्यायालयात उलटतपासणी घ्यायला आवडेल,’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाची कंपनी ‘टेम्पल इंटरप्रायझेस लिमिटेड’ची उलाढाल फक्त एका वर्षात १६ हजार कोटींनी वाढल्याच्या वृत्ताने देशभरात एकच खळबळ माजली आहे. कंपनी निबंधकाकडे केलेल्या नोंदणीनुसार जय शहा यांच्या कंपनीने नफा कमवायला सुरुवात केल्याचे वृत्तात म्हटले होते. कंपनीला मार्च २०१३, मार्च २०१४ मध्ये अनुक्रमे ६, २३० रुपये आणि १, ७२४ रुपयांचा तोटा झाला होता. तर २०१४-१५ मध्ये १८ हजार रुपयांचा नफा झाला. मात्र २०१५- १६ मध्ये कंपनीची उलाढाल ८० कोटी रुपयांवर पोहोचल्याचे कागदपत्रांवरुन उघड झाले.

जय शहांनी १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा केल्यावर न्यायालयात ‘द वायर’ची बाजू कोण मांडणार, याकडे लक्ष लागले होते. भूषण यांच्या ट्विटमुळे या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. याबद्दल अनेकांनी प्रशांत भूषण यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. न्यायालयात रंगणारा हा खटला लक्षवेधी असेल, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.