बिहारमधील महाआघाडीच्या विजयामागे प्रशांत किशोर या पडद्यामागून सूत्रे हलवणाऱ्या रणनीतीकाराचा मोठा हात आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची प्रचारमोहीम त्यांनीच हाताळली होती. त्यानंतर मे महिन्यापासून नितीशकुमार यांच्यासाठी प्रचारमोहीम आखणारे किशोर खऱ्या अर्थाने अजिंक्य ठरले. किशोर ज्यांच्यासाठी प्रचाराचे नियोजन करतात ते विजयी ठरतात हे अधोरेखित झाले. त्यामुळे एका अर्थाने किशोर ज्याला हात लावतात त्याचे सोने होते असेच म्हणावे लागेल.
३७ वर्षीय प्रशांत किशोर मूळचे बिहारमधील बक्सरचे. ते सार्वजनिक आरोग्य विषयातील जाणकार आहेत. संयुक्त राष्ट्रांमधील आफ्रिकेतील नोकरी सोडून २०१२ मध्ये गुजरातच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्यांनी प्रचारमोहीम आखली. त्यानंतर गेल्या वर्षी ते मोदींसाठी राष्ट्रीय स्तरावर गेले. त्यांनी मोदींच्या प्रचारात नवनव्या कल्पना आणल्या. ‘चाय पे चर्चा’सारखा लोकप्रिय उपक्रम हा त्यांचाच. त्यानंतर नितीशकुमार यांच्या प्रचारमोहिमेत त्यांनी ‘पर्चे पे चर्चा’ हा उपक्रम आखला. त्या अंतर्गत जनतेकडून सरकारच्या गेल्या दहा वर्षांतील कामगिरीबाबत प्रतिक्रिया मागवल्या. नितीशकुमार यांच्यावरील ‘मुन्न्ो से नितीश’ अशी मालिका काढण्यात आली. त्यात नितीशकुमार यांची मुख्यमंत्रीपदापर्यंतची वाटचाल मांडण्यात आली होती. त्याची कल्पना किशोर यांचीच. भाजपचे ज्येष्ठ नेते बिहारभर फिरण्यासाठी जेव्हा हेलिकॉप्टरमधून घिरटय़ा घालत होते तेव्हा नितीशकुमार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांच्या दारावर पोहोचून मते मागत होते. भाजपच्या आर्थिक ताकदीशी आपण स्पर्धा करू शकणार नाही हे लक्षात येताच किशोर यांच्या पथकाने ‘हर घर दस्तक’ मोहीम हाती घेतली होती. त्यांनी काही काळ काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या चमूसाठी काम केले होते. बिहारमधील विजयाने किशोर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.