जनता दल युनायटेड (जदयू) मध्ये सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) यासह अनेक मुद्यांवरून मतभेद निर्माण झाले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे नितीशकुमार यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहेत. प्रशांत किशोर यांच्या भूमिकेवर जदयूमध्ये नाराजी आहे. जदयूचे नेते अजय आलोक यांनी प्रशांत किशोर यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना थेट कोरोना विषाणूशी केली आहे.

“हा (प्रशांत किशोर) माणूस विश्वासू नाही. त्यांना पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांचा विश्वास जिंकता आला नाही. ते आपसाठी काम करतात. राहुल गांधींशी बोलतात. ममता बॅनर्जी यांच्यासोबतही असतात. कोण त्यांच्यावर विश्वास ठेवेल? आम्हाला आनंद आहे की, हा कोरोना विषाणू आपल्या सोबत आहे. ते कुठे पाहिजे तिथे जाऊ शकतात,” असे अजय आलोक यांनी एनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.

प्रशांत किशोर ट्विटरद्वारे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरून पक्षाच्या निर्णयावर सतत प्रश्न उपस्थित करत होते. प्रशांत किशोर यांनी दिल्लीत भाजप आणि जदयूच्या युतीवरसुद्धा निशाणा साधला होता. याच मुद्यावर नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर यांच्यावर टीका केली होती. “जर कोणी ट्विट करत असेल, तर ते करू द्या. जर कोणाला पक्षातून जायचे असेल तर ते जाऊ शकतात,” असं ते म्हणाले होते.