कोलकाता : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी हे काम यापुढे करणार नसल्याचा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतरही किशोर यांचा हा निर्णय धक्कादायक आहे. भाजपची बंगालमध्ये दोन अंकी संख्या गाठतानाही दमछाक होईल असे भाकीत त्यांनी डिसेंबरमध्ये वर्तवले होते. त्यामुळे वाद झाला होता. वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. भाजपला मदत करणारा इतका पक्षपाती निवडणूक आयोग पाहिला नव्हता असा आरोप त्यांनी केला. भाजपने कितीही प्रचारमोहीम राबविली तरीही पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयाबद्दल खात्री होती असे किशोर यांनी नमूद केले. मात्र भाजप राज्यात मोठी ताकद असल्याचे त्यांनी मान्य केले.

ममतांवर अभिनंदनाचा वर्षाव…

भाजपच्या वतीने सर्वात आधी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेसच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा, असे ट्वीट राजनाथ यांनी केले. प्रामुख्याने प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी ममतांचे अभिनंदन केले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे कार्याध्यक्ष व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ‘आप’चे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सपाचे प्रमुख अखिलेश यादव आदींचा समावेश आहे.