‘पद्मावत’ सिनेमावरुन निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी एक मोठा निर्णय घेतला असून त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. करणी सेनेकडून हल्ला होण्याची भिती असल्याने त्यांनी प्रतिष्ठित जयपूर साहित्य महोत्सव अर्थात जयपूर लिटरेचर फेस्टिवलला हजेरी न लावण्याचा निर्णय घेतला आहे. साहित्यिकांच्या या महाकुंभमेळ्यात आपल्यामुळे कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये. तसेच वादावर लक्ष केंद्रीत राहण्यापेक्षा महोत्सवातील नवनिर्मितीवर लक्ष केंद्रीत रहावे अशी अपेक्षा जोशी यांनी व्यक्त केली आहे.


जोशी म्हणाले, खूपच जड अंतकरणाने मी हा निर्णय घेतला असून त्यामुळे मला यंदा साहित्य आणि कवितांच्या या गंगेमध्ये डुंबता येणार नाही, याचे मला अतिव दुःख होत आहे.

पद्मावत सिनेमावरुन वाद निर्माण झाल्यानंतरही हा सिनेमा प्रदर्शित करण्याला प्रसून जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. आपल्या या निर्णयाबाबत त्यांनी म्हटले होते की, मी माझे हे काम अतिशय प्रामाणिकपणे केले असून माझा हा निर्णय दोन्ही बाजूंना न्याय देणारा होता. या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतरच प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र देण्यात आले होते.

आम्ही सिनेमाच्या विरोधकांशी सर्व प्रकारचा संवाद साधण्यासाठी तयार होतो, मात्र असे होऊ शकले नाही. जोशी अद्यापही या सिनेमाला विरोध करणाऱ्या राजपूत संघटनांना आवाहन केले आहे की, सेन्सॉर बोर्ड त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी अजूनही तयार आहे. हा वाद आणखी चिघळू नये यासाठी एकमेकांवर आपण विश्वास ठेवायलाच हवा असेही त्यांनी म्हटले आहे.

राजपूत संघटनांकडून प्रसून जोशी यांना जयपूर साहित्य महोत्सवात सहभागी न होण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ करीत झेड सुरक्षा प्रदान केली होती. मात्र, आता जोशी यांनी या महोत्सवाला हजेरीच न लावण्याचा निर्णय घेतला आहे.