माझे एन्काऊंटर करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. मला माझ्या घरी सकाळच्या वेळी आलेल्या एका माणसाने ही धक्कादायक माहिती दिली. मात्र मी घाबरलो नाही डगमगलो नाही. गेल्या काही वर्षांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. अनेक वर्षांपासून मी हिंदू एकतेसाठी लढतो आहे. मात्र जाणीवपूर्वक माझा आवाज दाबला जातो आहे असाही गंभीर आरोप विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केला आहे. प्रवीण तोगडिया बेपत्ता झाले होते आणि त्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत सापडले होते. काही वेळापूर्वी ते शुद्धीवर आले त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मी हिंदू एकतेसाठी प्रयत्न करतो आहे, झटतो आहे. मागील काही वर्षांपासून हिंदूंचा आवाज मी देशभरात पोहचवला. राम मंदिराची मागणी, गो हत्याबंदीचा कायदा, काश्मिरी पंडितांचा प्रश्न, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे उत्पादनाचे योग्य मूल्य मिळावे यासाठी मी प्रयत्न करतो आहे. मात्र जाणीवपूर्वक माझे प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रय़त्न केला जातो आहे. सेंट्रल आयबीने माझ्यासोबत काम करणाऱ्या डॉक्टरांना घाबवरण्यास सुरुवात केली. ज्याबाबत मी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते.

सद्यस्थितीतही सेंट्रल आयबीकडून मला शक्य तेवढा त्रास दिला जातो आहे. माझा आवाज दाबण्यासाठी देशभरात माझ्या विरोधात कायदेभंगाच्या केसेस दाखल केल्या जात आहेत. देशभरात माझ्याविरोधात खटले भरवण्यात आले. ज्या केसेस मला ठाऊकही नाहीत त्या जुन्या केसेस उकरून काढत माझे नाव त्यात गोवण्यात आले. मला अटक करण्याचा सातत्याने प्रयत्न होतो आहे. गुजरात पोलीस असो किंवा राजस्थान पोलीस मी कोणाच्याही विरोधात नाही. माझ्यावर राजकीय दबावाच्या अंतर्गत कारवाई करू नका मी न्यायालयासमोर आत्मसमर्पण करणार आहे असे आवाहन प्रवीण तोगडिया यांनी केले.या सगळ्याची सुरूवात गुजरातमधून सुरु झाली.

मकरसंक्रातीच्या दिवशी राजस्थान पोलिसांचे पथक मला अटक करण्यासाठी आले होते. माझा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्याचाच हा एक भाग आहे. या सगळ्या परिस्थितीतही मी डगमगलेलो नाही. हिंदू संघटनांची एकता अबाधित राहण्यासाठी मी काम करतो आहे. मी रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी मुंबईला गेलो होतो. तिथून मी रात्री १ वाजण्याच्या दरम्यान परतलो. मला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. मी पोलिसांना २.३० वाजता यायला सांगितले.  त्यानंतर सकाळी मी पूजा करत होतो, त्याचवेळी एक माणूस माझ्याकडे धावत आला. त्याने मला सांगितले तुम्ही आत्ताच्या आत्ता कार्यालय सोडा तुम्हाला ताब्यात घेऊन तुमचे एन्काऊंटर करण्यासाठी लोक निघाले आहेत अशी माहिती त्या अज्ञाताने मला दिली.  मी मृत्यूला घाबरत नाही त्यामुळे त्या माणसाच्या म्हणण्याकडे फारसे लक्ष दिले नाही.

मनात शंकेची पाल चुकचुकली, मात्र तेवढ्यात माझ्या फोनवर एक फोन आला ज्यात पोलीस स्टेशनमधून राजस्थान पोलिसांचे पथक मला अटक करण्यासाठी येत आहे. मी तातडीने कपडे बदलले. पैशांचे पाकिट घेतले. बाहेर पडलो, पोलिसांना सांगितले की मी कार्यालय सोडून जातो आहे. मी खाली येऊन रिक्षेत बसलो, माझ्यासोबत काही कार्यकर्ते होते. थलतेजच्या दिशेने निघालो. मी राजस्थानचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधला, आम्ही कोणत्याही प्रकारच्या पोलिसांना पाठवलेले नाही असे मला या दोघांनीही सांगितले. तुम्हाला पोलीस अटक करायला येणार असतील तर ते आम्हाला माहिती असते असेही उत्तर या दोघांनी मला दिले.

राजस्थानचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री जर पोलिसांना पाठवलेले नाही असे म्हणाले. त्यानंतर मी तातडीने माझे सगळे फोन बंद केले. मी कुठे जातो आहे हे समजू नये म्हणून मी ही खबरदारी घेतली. थलतेजमध्ये आमचा कोणीही कार्यकर्ता नाही, अशा एका माणसाच्या घरी गेलो. त्यानंतर दुसऱ्या फोनवरून राजस्थान पोलिसांबाबत माहिती घेतली. विचारपूस केल्यावर समजले की अरेस्ट वॉरंट घेऊन आले आहेत.

मी राजस्थानमधील वकिलांशी संपर्क करून हा वॉरंट रद्द करण्याचे प्रयत्न केले. मात्र मला कोर्टासमोर यायला हवे असे मला वकिलांनी सांगितले. माझ्याविरोधात षडयंत्र रचले जाते आहे हे मला लक्षात आले. मग जयपूरला जाण्याचे निश्चित केले. मी एकटा रिक्षाने जायला गेलो. तेवढ्यात मला चक्कर आली, घाम फुटला. मग रिक्षावाल्याला मी रूग्णालयात रिक्षा घ्यायला सांगितले. पुढे काय झाले ते आठवत नाही मात्र मी रात्री बाराच्या सुमारास जागा झालो तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. आता डॉक्टरांनी सांगितल्यावर मी जयपूर न्यायालयात जाऊन आत्मसमर्पण करेन असेही तोगडिया यांनी स्पष्ट केले. हे सगळे सांगत असताना तोगडिया यांना रडू कोसळले.