विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया काहीवेळापूर्वीच अहमदाबादमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांच्यावर सध्या अहमदाबादच्या चंद्रमणी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता होते. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते.

प्रवीण तोगडिया पोलिसांच्या अटकेत असताना बेपत्ता झाल्याचा खळबळजनक आरोप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. एका जुन्या प्रकरणात राजस्थान पोलिसांचे पथक तोगडिया यांना अटक करायला सोमवारी अहमदाबादमध्ये आले होते. मात्र, त्यानंतर अहमदाबाद गुन्हे शाखेने प्रवीण तोगडिया बेपत्ता असल्याचे सांगितले. तसेच आम्ही सध्या त्यांचा शोध घेत असल्याचेही पोलिसांनी म्हटले.

प्रवीण तोगडिया यांच्यावर सार्वजनिक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी राजस्थान पोलिसांचे पथक तोगडिया यांच्या निवासस्थानी त्यांना अटक करायला गेले होते. मात्र, आम्ही घरी गेलो तेव्हा तोगडिया तिथे नव्हतेच, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, ही बातमी ऐकल्यानंतर विहिंपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रवीण तोगडिया बेपत्ता झाले, असा आरोप करत विहिंपच्या कार्यकर्त्यांनी सोला पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. तसेच सरखेज-गांधीनगर द्रुतगती मार्गावरील वाहतूक रोखून धरली. पोलिसांनी लवकरात लवकर तोगडियांना शोधावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. आमच्या संघटनेचे अध्यक्ष सकाळी १० वाजल्यापासून बेपत्ता आहेत. आता त्यांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी प्रशासनाची आहे.

भाजपचे प्रवक्ते जय शहा यांनीही राजस्थान पोलिसांनी प्रवीण तोगडिया यांना पकडून नेल्याचे सांगितले. एका जुन्या प्रकरणात प्रवीण तोगडिया यांना पल्डी येथील विहिंपच्या मुख्यालयातून पोलिसांनी ताब्यात घेतले, असे जय शहा यांनी म्हटले. मात्र, राजस्थान पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. आमच्या पथकाने तोगडिया यांना अटक केलेलीच नाही. ते घरी नसल्यामुळे आमचे पथक त्यांना न घेताच परतले, अशी माहिती भरतपूरचे पोलीस महासंचालक आलोक कुमार वसिष्ठ यांनी दिली.