News Flash

प्रवीण तोगडियांना विहिंपमधून हटवणार? ५२ वर्षात पहिल्यांदाच होणार निवडणूक

अलीकडेच गुजरात विधानसभा निवडणूका झाल्यानंतर प्रवीण तोगडियांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्यामुळे आरएसएस त्यांच्यावर नाराज आहे.

प्रवीण तोगडिया

संघ परिवारातील कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून ओळख असलेले विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना पदावरुन हटवण्यात येणार असल्याची माहिती आहे. ५२ वर्षात प्रथमच विहिंपमध्ये अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक होणार आहे. न्यूज १८ चॅनलने हे वृत्त दिले आहे.

प्रवीण तोगडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघेही संघ परिवारातील आहेत. पण दोघांमध्येही अजिबात पटत नाही. अलीकडेच गुजरात विधानसभा निवडणूका झाल्यानंतर प्रवीण तोगडियांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्यामुळे संघ परिवारातील मुख्य संघटना राष्ट्रीय स्वंयसेवक संघ प्रवीण तोगडियांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. लवकरच तोगडियांच्या जागी नव्या नेत्याची निवड होणार आहे. तोगडियांनी राम मंदिराच्या मुद्यावरुनही मोदी सरकारला अनेकदा कोंडीत पकडले आहे.

येत्या १४ एप्रिलला गुरुग्राममध्ये विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. मागच्यावर्षी २९ डिसेंबरला भुवनेश्वरमध्ये अध्यक्ष निवडीसाठी विहिंपची बैठक झाली होती. पण त्यावेळी सदस्यांमधील मतभेदामुळे एकमताने निवड होऊ शकली नव्हती.
यावेळी सुद्धा हैदराबादचे राघव रेड्डी आणि हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विष्णू सदाशिव कोकजे यांच्यामध्ये चुरस असेल. राघव रेड्डी विहिंपचे विद्यमान अध्यक्ष असून संघ परिवार त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे तोगडिया आणि रेड्डी यांची हकालपट्टी अटळ आहे.

विहिंपमध्ये जी पद्धत आहे त्यानुसार अध्यक्षपदी निवडणून येणारी व्यक्ती आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करते. रेड्डी यांनी दोनवेळा प्रवीण तोगडिया यांची आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदावर नियुक्ती केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तोगडिया विहिंपचा कट्टर, आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा म्हणून ओळखले जातात. पण मोदीविरोधांमुळे संघटनेत टिकून राहण्याचा त्यांचा मार्ग खडतर झाला आहे.

जेव्हा तोगडिया यांना कोकजे अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असल्याचे समजले तेव्हा त्यांना धक्काच बसला. रेड्डी कट्टर, कटिबद्ध हिंदुत्ववादी नेते असून त्यांची निवड अशोक सिंघल यांनी केली होती. त्यामुळे निवडणुकीत आपण त्यांनाच पाठिंबा देऊ असे तोगडिया यांनी सांगितले. गुजरात विधानसभा निवडणुकीत तोगडियांना गुजरात भाजपाविरोधात काम केल्याची माहिती आहे तसेच २०१९ लोकसभा निवडणुकीच्यावेळी संघ परिवारातील संघटनांनामध्ये गोंधळ आणि दुफळी असल्याचा कुठलाही संदेश जाऊ नये यासाठी तोगडिया यांना हटवण्याची रणनिती आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2018 11:42 am

Web Title: pravin togadia vhp election
टॅग : Election,Pravin Togadia
Next Stories
1 पियूष गोयल यांच्या कंपनीच्या नफ्यात तीन हजार पटींनी वाढ ?
2 ‘सैराट’ची पुनरावृत्ती! दिल्लीत १८ वर्षांच्या तरुणाने केली मेहुण्याची हत्या
3 ‘या’ भारतीयाला दुबईत ५०० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
Just Now!
X