अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरु संगीत श्रीवास्तव यांनी पहाटे मशिदींमधील लाऊडस्पीकरचा वापर करण्याविरोधात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. प्रयागराजच्या पोलीस महानिरीक्षकांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना रात्री १० ते पहाटे सहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी असेल याची काळजी घेण्यास सांगितलं आहे. यावेळी सर्व लाऊडस्पीकर तसंच सार्वजनिक ठिकाणी संबोधित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणांवर बंदी असेल.

जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिक्षकांना पाठवण्यात आलेल्या पत्रात पोलीस महानिरीक्षक के पी सिंग यांनी अधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्ट तसंच अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशांची अमलबजावणी करण्यास सांगितलं आहे. आदेशात लाऊडस्पीकरच्या वापरावर रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंदी असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू असणाऱ्या प्राध्यापिका संगीता श्रीवास्तव यांनी अझानमुळे सकाळी माझी झोपमोड होते अशी तक्रार करणारं पत्र प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं होतं. तक्रारीची एक प्रत प्रयागराजच्या पोलीस महानिरीक्षकांना पाठवण्यात आली होती.

श्रीवास्तव यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये रोज पहाटे साडेपाच वाजता मशिदीमध्ये अजान होते. एवढ्या पहाटे होणाऱ्या अजानच्या आवाजमध्ये झोपमोड होते, असं म्हटलं होतं. तसंच झोपमोड झाल्यानंतर मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला तरी मला पुन्हा झोप लागत नाही असंही या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. अपुऱ्या झोपेमुळे दिवसभर डोकेदुखीचा त्रास होत असल्याने याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचं श्रीवास्तव यांचं म्हणणं आहे.