अंगावर 20 किलो वजनी सोन्याचे दागिने आणि निरनिराळ्या कारणांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोल्डन बाबांना (सुधीर मक्कड़) शनिवारी रात्री उशीरा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आखाडा परिषदेने हकालपट्टी करण्यात आलेल्या गोल्डन बाबांवर आपल्याच सरकारी सुरक्षारक्षकाला धमकावण्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोल्डन बाबासह त्यांच्या अन्य तीन सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती असून त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचं समजतंय. दरम्यान, पोलीस स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात साधू-संत जमा झाले होते अशीही माहिती आहे.

प्रयागराजमध्ये कुंभ मेळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीये. गोल्डन बाबाच्या सुरक्षेसाठी सतीश कुमार नावाचा एक ‘गनर’ तैनात करण्यात आला होता. सतीशचा आरोप आहे की, 5 डिसेंबर रोजी बाबा त्याला घेऊन गाझियाबादला जायला निघाले. पण परवानगीशिवाय त्याने जिल्हा सोडण्यास नकार दिला, त्यावर शिविगाळ करून धमकावले व खोटे गुन्हे दाखल करून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. याबाबतची माहिती सतीशने आपल्या वरिष्ठांना दिली आणि त्यांनी तातडीने त्याला बोलावून घेतले. त्यानंतर गोल्डन बाबाविरोधात दारागंज पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती.

या कुंभ मेळ्यात गोल्डन बाबाने अनेक वाद अंगावर ओढवून घेतले आहेत. सुरुवातीला कुंभमेळ्यात इच्छेप्रमाणे जागा मिळाली नाही म्हणून बाबाने अकांडतांडव केला. नंतर जुन्या आखाड्यातील झालेल्या वादामुळे त्यांची हकालपट्टी केली. यावेळी जुन्या आखाड्यातील पदाधिकाऱ्यांविरोधात त्यांनी केलेली तक्रार देखील पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे गोल्डन बाबाला प्रयागराज आखाड्यात अद्याप जागा मिळालेली नाही.