देशात मान्सूनची वाट पाहणे सुरू आहे. केरळात ६ जून रोजी मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे . भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार ६५ वर्षातील ही दुसरी वेळ आहे जेव्हा मान्सून पुर्व दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.

मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या पूर्व-पावसाच्या हंगामात पावसाची उणीव २५ टक्क्यांपर्यंत जाणवली.उत्तर-पश्चिम भारत, मध्य भारत, पूर्व-पूर्वोत्तर भारत आणि दक्षिण प्रायद्वीप या चार हवामान विभागांनी – कमीतकमी ३० टक्के, १८ टक्के, १४ टक्के आणि ४७ टक्के कमी पाऊस नोंदविला आहे, असे स्कायमेट म्हटले आहे.

पुर्व मान्सूनला “मँगो शॅावर” म्हणून संबोधले जाते, देशाच्या अनेक भागांमध्ये हा आवश्यक आहे. ओदिशासारख्या राज्यांमध्ये पुर्व मान्सूनच्या हंगामात आणि पूर्वोत्तर भारत आणि पश्चिम घाट भागांमध्ये पेरणी केली जाते. तर वन्य प्रदेश असलेल्या हिमालयात मान्सून पूर्व पावसाची सफरचंदाच्या लागवडीसाठी नितांत आवश्यकता असते. पावसाच्या ओलाव्यामुळे वन्य प्रदेशातील वणव्याच्या घटना देखील कमी होतात.

स्कायमेटने सांगितले आहे की, गेल्या ६५ वर्षांत हा दुसरा सर्वात वाईट पूर्व मान्सूनचा हंगाम आहे. २०१२ मध्ये सर्वात कमी पावसाची नोंद झाली तेव्हा देशभरातील पावसाच्या कमतरतेचे प्रमाण ३१ टक्क्यांपर्यंत पोहचले होते. एवढेच नाहीतर मान्सून पुर्व पावसाचे प्रमाण २०१९ मध्ये हे २००९ प्रमाणेच दिसत आहे, जेव्हा पावसाच्या उणीवेचे प्रमाण २५ टक्के होते. विशेष म्हणजे हे दोन्ही अल निनोचे वर्ष आहेत.