स्पॉट फिक्सिंग प्रकरणात जावयाला अटक होऊनही भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाच्या खुर्चीला घट्ट चिकटून बसलेल्या एन. श्रीनिवासन यांच्या राजीनाम्यासाठी शुक्रवारी आणखीनच दबावाचे वातावरण निर्माण झाले. क्रिकेटविश्वातील घडामोडींमुळे व्यथित झाल्याचे कारण पुढे करत मंडळाचे सचिव संजय जगदाळे आणि कोषाध्यक्ष अजय शिर्के यांनी श्रीनिवासन यांच्याकडे राजीनामे पाठवून दिल्याने त्यांच्यावरील नैतिक दडपण वाढले आहे. त्यातच मंडळाचे पाचही उपाध्यक्ष राजीनामे देण्याची चिन्हे आहेत.
श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन ‘स्पॉट-फिक्सिंग’मध्ये अडकल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी बीसीसीआयने त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली होती. जगदाळे यांनी या समितीमधूनही माघार घेतली आहे. त्याआधी जगदाळे, शिर्के आणि बीसीसीआयचे सहसचिव अनुराग ठाकूर यांनी श्रीनिवासन यांना दूरध्वनी करून राजीनाम्याची धमकी दिल्यामुळे बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीची घोषणा सायंकाळी करण्यात आली. आता ८ जूनला होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीआधीच दोन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. अशा तणावग्रस्त परिस्थितीत या बैठकीतही श्रीनिवासन यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.
आयसीसीने ताकीद दिली होती
दरम्यान, सट्टेबाजांशी संपर्क साधून असल्याच्या मुद्दय़ावरून  आयसीसीने गुरुनाथला आयपीएल सुरू होण्यापूर्वीच ताकीद दिली होती असेही शुक्रवारी स्पष्ट झाले. सट्टेबाजांपासून दूर राहा अशी ताकीद आयसीसीने गुरुनाथला दिली होती.