पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला दहा दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या काळात उपलब्ध असलेल्या हजार, पाचशेच्या नोटा निरुपयोगी झाल्या तर सुट्ट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे या कालावधीत अनेकांनी ऑनलाइन पेमेंटचा पर्याय निवडला. मात्र ऑनलाईन पेमेंटचा पर्याय जितका सोपा, सुलभ आहे, तितकाच तो धोकादायकदेखील ठरु शकतो. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करताना काही गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी.

असुरक्षित पोर्टल्स, पडताळणी न करता ऍप्स आणि सॉफ्टवेअर्सचा वापर अनेकदा संकटांना आमंत्रण देऊ शकतो. कारण यामधून पेमेंट करताना तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डमधील माहिती हॅकर्सला मिळू शकते. याशिवाय दुकानात जाऊन शॉपिंग केल्यावर डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या सहाय्याने पेमेंट करताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कार्ड स्वाईप करताना त्याची माहिती कॉपी केली जाऊन मग त्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो.

थोडी काळजी घेतल्यास, सतर्कता राखल्यास ऑनलाईन पेमेंट अधिक सुरक्षित करता येऊ शकते. ऑनलाईन पेमेंट करताना खालील गोष्टींची काळजी घ्या.

१. पोर्टलवर जाताना URL लिंकमध्ये एस अक्षर आहे का, हे तपासून पाहा. http च्या पुढे s हे अक्षर आहे का, याची खातरजमा करुन घ्या.
२. पोर्टलची URL लिंक व्यवस्थित तपासा. URL मधील प्रत्येक अक्षर नीट पाहा. कारण फसवणूक करणाऱ्यांकडून अनेकदा खोट्या वेबसाईट्स तयार केल्या जातात. या खोट्या लिंक्स अगदी हुबेहूब खऱ्या लिंक्स सारख्या दिसतात.
३. तुमची आर्थिक माहिती कोणालाही देऊ नका. विशेषत: मेसेजवर तुमची कोणतीही माहिती शेअर करु नका.
४. जर तुम्हाला ऍपच्या वैधतेबद्दल शंका असेल, तर त्या ऍपचा वापर करु नरा. ऍपचा वापर करताना त्याची माहिती काळजीपूर्वक वाचा. नियम आणि अटी वाचल्यावरच ऍप वापरायचे की नाही याचा निर्णय घ्या. याशिवाय ते ऍप वापरणाऱ्या लोकांनी लिहिलेल्या प्रतिक्रियादेखील वाचा.
५. ऑनलाईन पेमेंटचा वापर वारंवार करत असल्यास मोबाईलसाठी सिक्युरिटी प्लान घ्या. अनेक कंपन्यांचे सिक्युरिटी प्लान बाजारात उपलब्ध आहेत.
६. अनेकदा अधिकृत ऍप डाऊनलोड करताना काही रक्कम मोजावी लागते. मात्र तेच ऍप प्ले स्टोअरवर मोफतदेखील उपलब्ध असू शकते. हे मोफत उपलब्ध असलेले ऍप अनधिकृत असण्याची शक्यता असते. त्यामुळे या ऍपची माहिती नीट तपासूनच त्याचा वापर करा.

ऍप, यूआरएल, वेबसाईट यांची वैधता तपासून घेताना थोडा वेळ नक्की लागू शकतो. मात्र नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधीच सतर्क राहणे, फायदेशीर ठरू शकते. कोणतीही खातरजमा न करता केलेल्या व्यवहारामुळे नंतर मनस्ताप आणि आर्थिक नुकसान होण्यापेक्षा आधीच काळजी घेणे कधीही योग्य ठरते.