रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला सावरत तो मदतीसाठी आक्रोश करत राहिला पण मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. गुजरातच्या सूरतमधील ही घटना आहे. आपल्या पतीसोबत रस्त्यावरून जात असलेल्या एका महिलेवर हल्लेखोराने भर रस्त्यात चाकूने हल्ला केला. घायाळ पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी पती टाहो फोडत राहिला पण त्याचा आक्रोश व्यर्थ ठरला. जीवन आणि मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या पत्नीने पतीच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला. मानवतेला लाज आणणारी ही घटना सूरतमधील पंडेसरा येथील असून, हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेली अनिता मूळची ओडिशाची राहाणारी होती. गुजरातमधील धर्मेशशी तिचे लग्न झाले होते. रविवारी आपल्या पतीसोबत जात असताना हल्लेखोराने तिच्यावर चाकूने हल्ला केला.

‘ओडिशा टिव्ही’ या स्थानिक वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, पत्नीवर झालेल्या हल्ल्यानंतर पती रडतरडत उपस्थितांकडे मदतीसाठी याचना करत राहिला. परंतु, उपस्थित अथवा येणाऱ्या-जाणाऱ्यांपैकी कोणीही मदतीला पुढे आले नाही. मदतीचा हात पुढे न आल्याने अनिताने रस्त्यावरच पतीच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला. कळस म्हणजे तेथे उपस्थित असलेल्यांनी या घटनेचे मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग करण्यात धन्यता मानली.

हल्लेखोर हा अनिताचा नातेवाईक असल्याचे समजते. संपत्तीच्या वादातून हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हल्लेखोर बऱ्याच काळापासून अनिताकडे संपत्तीमधील वाट्याची मागणी करत होता, अशी माहिती अनिताच्या एका नातेवाईकाने पोलिसांना दिली. सूरतच्या पंडेसरा पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. सध्या आरोपी फरार आहे. याआधीदेखील मानवतेला लाज आणणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. असे अनेकवेळा होते की, गरजवंताला मदत न करता उपस्थित केवळ बघ्याची भूमिका घेतात.