सिंहांनी रस्ता अडवल्याने रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गुजरातमधील राजकोट येथील गिर सोमनाथ जंगलात बुधवारी रात्री ही घटना घडली. प्रसूतीकळा होत असल्याने महिलेला रुग्णवाहिकेतून नेलं जात होतं. गावातील कच्च्या रस्त्याने रुग्णवाहिका जात होती. पण रुग्णालयापासून सहा किमी अंतरावर असतानाच चालकाला चार सिंह रस्ता अडवून बसले असल्याचं दिसलं. यावेळी सिंह तेथून हटण्याच्या तयारीत नव्हते. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास हे सगळं घडलं.

“परिस्थिती खूपच किचकट होती. आम्हाला लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचायचं होतं पण सिंह रस्त्यातून हटण्यास तयार नव्हते. मी याच परिसरात असल्याने सिंह नेमके कसे वागतात याची कल्पना आहे. रुग्णवाहिकेत पूर्ण भीती पसरली होती. मला माहिती होतं की आता मलाच रुग्णवाहिकेत महिलेची प्रसूती करावी लागणार आहे. माझे हात थरथरत होते,” असं मेडिकल टेक्निशिअन जगदीश मकवाना यांनी सांगितलं आहे.

रुग्णवाहिकेतून ३० वर्षीय अफसाना रफीक या महिलेला रुग्णालयात नेलं जात होतं. रुग्णालयात लवकर पोहोचण्यासाठी अर्ध्या तासात १२ किमी अंतर कापलं होतं. पण त्याचवेळी अचानक सिंह समोर आले. यानंतर जगदीश मकवाना यांनी फोनवरुन डॉक्टरांशी संवाद साधत त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करत यशस्वीपणे महिलेची प्रसूती केली.

यावेळी रुग्णवाहिकेत आशा वर्कर रसिला मकवानादेखील हजर होत्या. एकीकडे बाहेर सिंहांचा आवाज असताना दुसरीकडे रुग्णवाहिकेत नवजात बाळाचा आवाज घुमला होता. अफसाना यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या आवाजाने काही वेळापूर्वी पसरलेली भीती आनंदात रुपांतरित झाली. नवजात मुलीचं वजन तीन किलो होतं.

२० ते २५ मिनिटांनी सिंह निघून गेल्यावर रुग्णवाहिकेने पुढील प्रवास सुरु केला. अफसाना आणि त्यांची मुलगी रुग्णालयात असून दोघीही सुखरुप असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.