भारत डिजिटल व तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या प्रगत होत असल्याचा दावा केला जात असला, तरी देशाच्या ग्रामीण भागात परिस्थिती अजूनही किती विदारक आहे, हे दाखवून देणारी एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यात रूग्णवाहिका नसल्यामुळे शुक्रवारी एका महिलेने प्रसुतीसाठी तब्बल २० मैलांची पायपीट केली. दुर्दैव म्हणजे एवढे प्रयत्न करूनही ही महिला आरोग्य केंद्रात पोहचलीच नाही. तिची प्रसुती रस्त्यातच झाली आणि वैद्यकीय सुविधांअभावी या महिलेला आपल्या नवजात मुलीला गमवावे लागले.

कटनी जिल्ह्यातील बारमनी गावात राहणारी बिना ही गरोदर होती. काल तिला प्रसुतीवेदना सुरू झाल्यानंतर तिच्या पतीने तिला बारही येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी रूग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, आरोग्य केंद्राकडून बारमनीपर्यंत रुग्णवाहिका आणण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे बिना आणि तिचा पती चालतच बारही आरोग्य केंद्राच्या दिशेने निघाले. दरम्यानच्या काळात प्रसुतीवेदना वाढल्यामुळे बिनासाठी परिस्थिती असह्य झाली होती. तरीही बिना जिद्दीने २० किलोमीटरचे अंतर पायी पार करून बारही गावापर्यंत पोहोचली. मात्र, ती सार्वजनिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रस्त्यात तिने मुलीला जन्म दिला. बिना चालत असतानाच मुलगी गर्भातून बाहेर आल्याने ती थेट जमिनीवर पडली. त्यामुळे या नवजात मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप बिनाच्या कुटुंबियांनी केला आहे. आम्ही रुग्णवाहिका आणण्यासाठी बारही आरोग्य केंद्राशी संपर्क साधला होता. मात्र, त्यांनी आमच्या गावापर्यंत येण्यास नकार दिला, असे बिनाच्या कुटुंबियांनी सांगितले.

पत्नीचा मृतदेह खांद्यावर नेणा-या दाना मांझींना बहारीनच्या पंतप्रधानांकडून लाखोंची मदत

मात्र, कटनी जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी अशोक अवधिया यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बिनाची मुलगी सातव्या महिन्यातच (प्री- मॅच्युअर बेबी) जन्माला आल्याने जगू शकली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बिनाच्या कुटुंबियांना संपर्क साधला तेव्हा रूग्णवाहिका बारही आरोग्य केंद्रावर नव्हती. या भागातील गरोदर स्त्रियांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेली ‘जननी एक्स्प्रेस’ रूग्णवाहिका आमच्या नियंत्रणाखाली नाही. भोपाळमधून ही रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते, असे अशोक अवधिया यांनी सांगितले. दरम्यान, आता प्रशासनाकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.