गरोदर महिलेच्या मृत्यूनंतरही तिच्या बाळाला डॉक्टरांनी वाचवलं आहे. लंडनमध्ये ही घटना घडली आहे. बाण लागल्याने महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती युके प्रेस असोसिशनने दिली आहे. लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी हत्येप्रकरणी 50 वर्षीय रामानोज याला अटक केली आहे. साना मोहम्मद असं मृत महिलेचं नाव आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, रामानोज हा सानाचा घटस्फोटित पती आहे.

साना मोहम्मद आठ महिन्यांची गर्भवती होती. बाण लागला तेव्हा साना आपल्या मुलासोबत होती. सुदैवाने तिच्यासोबत त्यावेळी असणाऱ्या मुलाला बाण लागला नाही. जखमी अवस्थेत सानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सानाचा सध्याचा पती इम्तियाज मोहम्मद याने इव्हिनिंग स्टँडर्ड वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, ‘पाचही मुलांसमोर पत्नी सानाची हत्या करण्याआधी आरोपी गार्डनमध्ये लपला होता’. ‘माझा तिचा मृत्यू झाला आहे यावर विश्वासच बसत नाही आहे. कदाचित तो बाण मलाही लागला असता. सर्व मुलं सुरक्षित असून हे खूपच धक्कादायक आहे’, असं त्याने सांगितलं आहे.

‘ती एक चांगली आई आणि पत्नी होती. आम्ही सात वर्षांपासून एकत्र होतो. आम्हाला खूप यातना होत आहेत’, असं इम्तियाज मोहम्मदने सांगितलं आहे. प्रसूतीसाठी अजून चार आठवड्यांचा वेळ होता मात्र त्याआधीच ही घटना घडली. बाण लागलेल्या अवस्थेत डॉक्टरांनी सानाची प्रसूती केल्याची माहिती मोहम्मदने दिली आहे.