अज्ञात लुटारुंनी धावत्या ट्रेनमधून एका गर्भवती महिलेला बाहेर फेकून दिले. आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरममध्ये मंगळवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. बंगळुरुला जाणाऱ्या कोंडावीडू एक्सप्रेसमधून ही महिला प्रवास करत होती. के. दीव्या असे जखमी महिलेचे नाव असून ती आंध्र प्रदेशच्या गुंटुर जिल्ह्याची निवासी आहे.

पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असेलली दीव्या सात महिन्यांची गर्भवती आहे. तिचा नवराही बंगळुरुमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. ही घटना घडली त्यावेळी दिव्यासोबत तिची सासूही होती. दिव्या आणि तिची सासू एका समारंभासाठी आंध्र प्रदेशला गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून परतत असताना ही घटना घडली असे रेल्वे पोलीस निरीक्षक कृष्णाम मोहन यांनी माहिती दिली.

सोमवारी रात्री दोघींनी नारासाराओपेट स्थानकातून ट्रेन पकडली. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास ट्रेन धर्मावरम येथील गोलापल्ली गेट जवळ पोहोचली. त्यावेळी दिव्या वॉश बेसिनमध्ये हात धुत होती. त्यावेळी सफेर रंगाचा टी-शर्ट घातलेल्या व्यक्तीने तिच्या गळयातील चैन खेचण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिने त्याला विरोध केला तेव्हा त्याने दिव्याला ट्रेन बाहेर ढकलून दिले.

ट्रेनमधून पडल्यानंतर चक्कर आल्यामुळे दिव्या काही वेळासाठी बेशुद्ध झाली होती. थोडयावेळाने शुद्ध आल्यानंतर तिने चालत जवळची वस्ती गाठली व स्थानिकांच्या मदतीने नवऱ्याला घडलेल्या प्रकाराबद्दल कळवले. दिव्याला उपचारासाठी धर्मावरम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती जखमी झाली आहे. पोलिसांनी दिव्याची जबानी नोंदवल्यानंतर अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.