हज यात्रेचे व्यवस्थापन करणाऱया मध्यवर्ती हज समितीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या नियमावलीनुसार हज यात्रेसाठी अर्ज करताना संबंधित महिला गर्भवती असेल आणि ४ महिने पूर्ण झाले असतील तर तिला यात्रेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात येणार नाही.
येत्या सप्टेंबर महिन्यापासून हज यात्रेस सुरूवात होणार आहे. ही यात्रा मुस्लिमांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, मध्यवर्ती समितीच्या या नव्या निर्णयामुळे गर्भवती महिलांना यात्रेस मुकावे लागणार आहे. चार महिन्यांपेक्षा जास्त काळ गर्भवती असलेल्या महिलांना हज यात्रेसाठी अर्ज भरता येणार नाही आणि संबंधित महिलेने गर्भवती असल्याची माहिती लपवल्याचे उघड झाल्यास तिला हजला जाणाऱया विमानातून खाली उतरविण्यात येईल, असेही समितीच्या अधिकाऱयांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, गर्भवती महिलांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे समितीचे म्हणणे आहे. हज यात्रेतील पहिले पाच दिवस शारीरिक क्षमतेचे कठोर परीक्षा पाहणारे असतात. त्यामुळे गर्भवती महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच हा निर्णय घेण्यात आल्याचे समितीच्या अधिकाऱयांनी सूचना पत्रात म्हटले आहे.