पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी हिच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या एफआयआरच्या तपासाबाबत काही माध्यमांनी दिलेले वृत्त सनसनाटी निर्माण करणारे आणि पूर्वग्रहदूषित असल्याचे सूचित होत आहे, असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले. मात्र अशा प्रकारचे वृत्त या घडीला काढून टाकण्याबाबतचे आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला.

दिल्ली पोलिसांनी केलेली ट्वीट्स आणि वृत्त काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या अंतरिम याचिकेवर कालांतराने विचार केला जाईल, असे न्या. प्रतिभा एम. सिंह यांनी म्हटले आहे. तथापि, माध्यम समूहांनी तपासातील फुटलेली माहिती प्रसारित करू नये कारण त्याचा चौकशीवर परिणाम होऊ शकतो, असेही न्या. सिंह यांनी म्हटले आहे. आम्ही कोणतीही माहिती फोडलेली नाही किंवा ती फोडण्याचा आमचा हेतू नाही या प्रतिज्ञापत्रात मांडण्यात आलेल्या भूमिकेचे पालन करावे, असा आदेशही न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिला.

कायद्यानुसार पोलीस या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करू शकतात, माध्यमसमूहांनी त्यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळणारी माहिती योग्य आहे का याची खातरजमा करावी आणि खातरजमा केलेला भागच प्रसिद्ध करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. आपल्याविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या एफआयआरशी संबंधित कोणतीही माहिती माध्यमांना पोलिसांनी देऊ नये असे निर्बंध पोलिसांवर घालण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका दिशा रवी यांनी केली असून त्यावर सुनावणी सुरू आहे.

न्यायालयीन कोठडीत रवानगी

टूलकिट प्रकरणात  दिशा रवी हिची दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याआधी तिची पाच दिवस पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. ती मुदत संपल्यानंतर पोलिसांनी तिला न्यायालयासमोर हजर केले तेव्हा अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी तिची तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.