श्रीलंकेमध्ये प्रेमलाल जयशेखरा यांनी मंगळवारी खासदारकीची शपथ घेतली. एकेकाळी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले प्रेमलाल आता खासदार झाले आहेत. प्रेमलाल हे ४५ वर्षांचे आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये विजय मिळवला. सत्ताधारी श्रीलंका पोडुजन पक्षाकडून ते निवडणूक लढले आणि जिंकले. त्यांनी २०१५ मध्ये एका प्रचारसभेमध्ये विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यावर गोळीबार केला होता. यामध्ये कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. श्रीलंकेमधील कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणामध्ये प्रेमलाल यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.

प्रेमलाल यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाचा निकाल आल्याने त्यांना निवडणूक लढवता आली. श्रीलंकेमधील निवडणूक आयोगानेही त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली. विशेष बाब म्हणजे तुरुंगामध्ये कैद असतानाही प्रेमलाल निवडणूक जिकले. २००१ पासून ते खासदार आहेत. मृत्यूदंडाची शिक्षा मिळाल्यानंतरही एखादी व्यक्ती खासदार म्हणून निवडूण येण्याची ही श्रीलंकेमधील पहिलीच वेळ आहे. यासंदर्भातील वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

प्रेमलाल यांना तुरुंग प्रशासनाने २० ऑगस्ट पासून सुरु झालेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली नाही. मात्र न्यायालयाने नंतर प्रेमलाल यांना परवानगी दिली. न्यायालयाने प्रेमलाल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांना सोमवारी त्यांच्या बाजूने निकाल दिला. प्रेमलाल यांना खासदार म्हणून त्यांच्या अधिकारांचा वापर करण्याचा हक्क आहे, असं न्यायालयाने म्हटलं. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे चोख सुरक्षाव्यवस्थेमध्ये प्रेमलाल यांना मंगळवारी संसदेमध्ये आणण्यात आलं. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर त्यांना पुन्हा तुरुंगातमध्ये नेण्यात आलं.

प्रेमलाल शपथ घेत असतानाच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. प्रेमलाल शपथ घेत असतानाच सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांनी आरडाओरड केला आणि प्रेमलाल यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली. प्रेमलाल यांना शपथ घेऊ दिल्याने विरोधी पक्षाने सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी न होता वॉकआऊट केलं.