निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपींच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी तिहार तुरुंगात तयारी सुरु करण्यात आली आहे. शनिवार, १ फेब्रुवारी २०२० रोजी या चारही दोषींना फाशी देण्यात येणार आहे. दरम्यान, तुरुंग प्रशासनाने या चौघांकडे त्यांची शेवटची इच्छा विचारली आहे.

यापूर्वी चारही दोषींच्या नावे डेथ वॉरंट जारी करुन २२ जानेवारी ही फाशीची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, आरोपींचे काही प्रकरणं प्रलंबित राहिल्याने नव्याने डेथ वॉरंट काढण्यात आले आणि १ फेब्रुवारी २०२० ही फाशीची ताऱीख निश्चत करण्यात आली. दरम्यान, तिहार तुरुंगात ही फाशी दिली जाणार असल्याने त्यासंबंधीची पूर्वतयारी करण्यात येत आहे.

दरम्यान, तिहार तुरुंग प्रशासनाने या चारही गुन्हेगारांना नोटीस पाठवून त्यांच्याकडे शेवटच्या इच्छेची विचारणा केली आहे. १ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या फाशीपूर्वी त्यांना शेवटचे कोणाला भेटायचे आहे का? तुमच्या नावे कुठलीही मालमत्ता असेल तर ती इतर कोणाच्या नावे करायची आहे का? तसेच जर तुम्हाला कुठले धार्मिक पुस्तक वाचायचे असेल किंवा कोणत्या धर्मगुरुची भेट घ्यायची इच्छा आहे का? अशा स्वरुपाचे काही प्रश्न त्यांना विचारण्यात आले. मात्र, यावर चारही दोषींनी काय इच्छा व्यक्त केली हे अद्याप कळू शकलेले नाही.

फाशीपूर्वी एकाने सोडले अन्न

फाशीची तारीख जसजशी जवळ येत आहे तशी एका दोषीमध्ये अस्वस्थता पहायला मिळत असल्याचे तुरुंग प्रशासनाच्या सुत्रांकडून कळते. फाशीच्या भीतीने त्याने जेवण सोडले आहे. दोन दिवस जेवण न केल्यानंतर वारंवार आग्रह केल्याने बुधवारी त्याने थोडे जेवण ग्रहण केले. दरम्यान, इतर दोघांच्या जेवणात कुठलाही फरक पडलेला नसल्याचेही तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे.