भारत एकाचवेळी पाकिस्तान आणि चीन अशा दोन्ही आघाड्यांवर युद्ध करण्यास सक्षम असल्याचे भारताचे नवे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले. त्यांनी सोमवारी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले. भारताकडून अग्नी-५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आल्यानंतर चीनच्या भुवया उंचावल्या होत्या. पाच हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक भेद करू शकत असल्यामुळे संपूर्ण चीन या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बिपीन रावत यांनी भारतीय सैन्य एकाचवेळी पाकिस्तान आणि चीन अशा दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी तयार असल्याचे विधान केले आहे. संबंधित राजकीय नेतृत्त्वाकडून देण्यात आलेली कामगिरी कोणत्याही परिस्थितीत पार पाडण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचेही यावेळी रावत यांनी सांगितले. मात्र, असे असले तरी चीनच्याबाबतीत आमचा भर हा सहकार्य आणि वाद टाळण्यावरच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी लष्करप्रमुखांनी पुन्हा एकदा पाकला इशारा दिला. सीमेपलिकडचा दहशतवाद निपटून काढण्यासाठी भारताकडे सर्जिकल स्ट्राईकपेक्षाही प्रभावी पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. सर्जिकल स्ट्राईक हेच आमच्या लष्काराचे भविष्यातील एकमेव हत्यार राहिल या भ्रमात राहू नये. सर्जिकल स्ट्राईक हा एक नमूना असून आमच्याकडे असे कितीतरी प्रभावी पर्याय आहेत, असा इशारा लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिला. सरकारने रावत यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती केली होती. त्यांनी नियुक्ती करताना सेवाज्येष्ठतेला डावलले होते. १९८३ नंतर पहिल्यांदाच लष्करप्रमुखांची नियुक्ती करताना सेवाज्येष्ठता गृहीत धरण्यात आली नाही. बिपीन रावत यांची लष्कर प्रमुखपदी नियुक्ती करताना लेफ्टनंट प्रवीण बक्षी आणि लेफ्टनंट पी. एम. हारिज यांना डावलले होते. या नियुक्तीवरून वादही झाला होता. काहींनी या नियुक्तीला धार्मिक रंगही देण्याचा प्रयत्न केला होता. पंतप्रधान मोदी यांना लष्कर प्रमुखपदावर कोणत्याही मुस्लिम व्यक्तीला नियुक्त करायचे नव्हते, असा आरोप करण्यात आला होता. याबद्दल रावत यांना विचारण्यात आले असता लष्कराच्याबाबतीत राजकारण करू नये, असे त्यांनी सांगितले. पदभार स्विकारल्यानंतर लेफ्टनंट प्रवीण बक्षी यांच्याशी माझी चांगली चर्चा झाली. ते दु:खी आहेत असं वाटलं नाही, असे त्यांनी सांगितले.