प्रसिद्ध समाजसेविका इला रमेश भट यांना सोमवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते इंदिरा गांधी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रांमध्ये विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येतो.इला भट या ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमन्स असोसिएशन’ या संघटनेच्या संस्थापक असून पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत भट यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतातील महिलांचे सबलीकरण करण्याकामी इला भट यांनी केलेल्या अनन्यसाधारण कामगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. २५ लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
भट यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. ‘युद्ध नाही याचा अर्थ शांतता आली असा नव्हे. शांतता युद्धास दूर ठेवते एवढेच नव्हे तर शांततेमुळे नि:शस्त्रीकरणास मदत होते आणि युद्धाची निष्फळता शांततेमुळेच ध्यानी येते. या एकूण पाश्र्वभूमीवर शांततेसंबंधीच्या आपल्या कल्पना तपासण्याची संधी या पुरस्कारामुळे प्राप्त झाली आहे’, असे इला भट यांनी नमूद केले. शांततेमुळे समाजातील समतोल पुनस्र्थापित होण्यात मदत होते, असेही त्या म्हणाल्या.पाश्चिमात्य आर्थिक कार्यक्रमांबद्दल भट यांनी सावधानतेचा इशारा दिला व मनुष्याच्या सहा मूलभूत गरजांची पूर्तता त्याच्या ठिकाणापासून १०० मैलांच्या परिसरात झाली तर एक नवीन अर्थव्यवस्था वाढीस लागेल आणि साऱ्या जगास त्याची दखल घ्यावी लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले. अन्न, वस्त्र, निवारा, प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्य रक्षण आणि बँकिंग या सहा सुविधांवर भट यांनी भर दिला.