ब्राझीलमधील डाव्या पक्षाचे दशकभराचे वर्चस्व संपुष्टात
महाभियोगाचा सामना करण्यासाठी ब्राझीलच्या अध्यक्ष दिलमा रूसेफ यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले. लॅटिन अमेरिकेतील या सर्वात मोठय़ा देशात डाव्या पक्षांची सत्ता संपुष्टात आणणाऱ्या या राजकीय भूकंपात रूसेफ यांना त्यांचे राजकीय शत्रू ठरलेले उपाध्यक्ष मिशेल टेमर यांच्या हाती सत्ता सोपवावी लागली आहे.
सुमारे २२ तास चाललेल्या वादविवादानंतर सिनेटने ब्राझीलच्या या पहिल्या महिला अध्यक्षांच्या विरोधात ५५ विरुद्ध २२ असा मोठा कौल दिला. महाभियोग समर्थक सिनेटर्सनी टाळ्यांच्या कडकडाटात या निकालाचे स्वागत केले.
अर्थसंकल्पीय लेखाविषयक कायद्यांचा (बजेट अकाऊंटिंग लॉज) भंग केल्याच्या आरोपाबाबत न्यायालयाचा निकाल येईपर्यंत ६८ वर्षांच्या रूसेफ यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याकरता ८१ सदस्यांच्या सिनेटमध्ये केवळ साध्या बहुमताची आवश्यकता होती. त्यांना पदावरून घालवण्यासाठी दोन तृतीयांश मते आवश्यक असून, त्यांच्यावरील खटला आता अनेक महिने चालू शकेल.
मधल्या-उजव्या विचारसरणीच्या पीएमडीबी पक्षाचे मिशेल टेमर यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर रूसेफ यांच्या डाव्या विचारांच्या वर्कर्स पार्टीचे दशकभराहून अधिक कालावधीचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. मिशेल हे लवकरच नव्या सरकारची घोषणा करण्याच्या तयारीत असून, गेल्या अनेक दशकांमधील सर्वात वाईट मंदीतून ब्राझीलला बाहेर काढणे आणि रूसेफ यांच्याविरुद्धच्या लढय़ाच्या काळात काँग्रेसला वेढलेला लकवा संपवणे याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.