अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाची सुनावणी सिनेटमध्ये मंगळवारी सुरू होत असून ट्रम्प यांच्या बचावफळीतील वकील व अभियोक्ते हे नेमके काय युक्तिवाद करायचे यावर चर्चा करीत आहेत.

ट्रम्प यांच्या वकिलांनी रविवारी महाभियोगात नेमका कसा बचाव करायचा या मुद्दय़ांवर चर्चा केली. ट्रम्प यांच्यावरील आरोप अवैध व चुकीचे आहेत असा ट्रम्प यांच्या बाजूने केला जाणारा संभाव्य बचाव डेमोक्रॅटिक पक्षाने खरेतर आधीच फेटाळला आहे. सिनेटमध्ये आता सर्व सिनेटर्सची उपस्थिती सुनावणीवेळी अत्यावश्यक असल्याने डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय शर्यतीत असलेले चार उमेदवार त्यांचा प्रचार सोडून वॉशिंग्टनला आले आहेत. बाजूने तसेच विरोधातील वकिलांनी नियमांबाबत एकमेकांना टिपण्या सादर केल्या आहेत.

अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षीय काळात युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणून त्यांना अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतील संभाव्य प्रतिस्पर्धी जो बिदेन यांच्या युक्रेनमधील व्यवहारांची चौकशी करण्यास सांगितले होते, त्यात त्यांनी अधिकाराचा दुरूपयोग केला असा पहिला आरोप आहे. त्यानंतर प्रतिनिधिगृहात या प्रकरणी महाभियोग चौकशी सुरू असताना व्हाइट हाऊसचे अधिकारी व इतर सहकाऱ्यांना समितीसमोर साक्ष देण्यापासून रोखल्यामुळे त्यांनी पुरावे गोळा करण्यात बाधा आणली असा दुसरा आरोप आहे.

ट्रम्प यांच्या बचाव चमूतील वकील अ‍ॅलन डेरशोवित्झ यांनी सांगितले, की ट्रम्प यांचे वर्तन गुन्हेगारी स्वरूपाचे नाही, असा ठाम युक्तिवाद आपण करणार आहोत. ‘गुन्हा नाही व महाभियोग नाही’ हा रिपब्लिकन बचाव चमूचा युक्तिवाद डेमोक्रॅटिक पक्ष तसेच अमेरिकेच्या बौद्धिक वर्तुळातून फेटाळण्यात आला आहे.

ट्रम्प यांच्याकडून शेतक ऱ्यांचे आभार

चीनबरोबरच्या व्यापार युद्धात खंबीरपणे साथ दिल्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशीताल शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. अमेरिकेने चीनबरोबर उत्तर अमेरिकी व्यापार करार केला असून त्याच्या जोडीला आणखी एक करार केला आहे त्याचा फायदा अमेरिकी शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.