03 August 2020

News Flash

अहमदाबाद दौरा अचंबित करणारा ठरेल!

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विश्वास

डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हान्का (डावीकडे), पत्नी मेलानिया ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विश्वास

वॉशिंग्टन : अहमदाबादमध्ये आपल्या स्वागतासाठी किती लोक येतील, याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने वक्तव्य केले आहे. आपल्या स्वागतासाठी १० दशलक्ष लोक येतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सांगितले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, अहमदाबाद येथे माझे भव्य स्वागत होणार आहे. ६० लाख ते १ कोटी लोक स्वागतासाठी येणार आहेत असे मला सांगण्यात आले आहे. एका नवीन स्टेडियमवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘नमस्ते ट्रम्प मेळावा’ अहमदाबाद येथे होणार असून त्यामुळे मलाही अचंबित झाल्यासारखे वाटेल. भारतात जर एक कोटी लोक आले तर आपल्या देशात सभेसाठी होणारी गर्दी यापुढे किरकोळ वाटेल.

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत. अहमदाबाद विमानतळापासून ते मोतेरा स्टेडियम या मार्गावर सात दशलक्ष लोक आपल्या स्वागतासाठी येतील, असे मोदी यांनी सांगितल्याचे ट्रम्प मंगळवारी म्हणाले होते. मात्र आता १० दशलक्ष लोक स्वागतासाठी येतील असा दावा ट्रम्प यांनी गुरुवारी केला.

विमानतळ ते स्टेडियम या मार्गावर सहा ते १० दशलक्ष लोक स्वागतासाठी येणार असल्याचे आपण ऐकले आहे, असे ट्रम्प म्हणाले. दरम्यान, अहमदाबादमधील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, अहमदाबाद शहराची लोकसंख्या ७० लाख आहे. त्यामुळे एक ते दोन लाख लोक स्वागतासाठी येतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भारताने गेली अनेक वर्षे चढे आयात कर लावले असून त्यामुळे अमेरिकेला व्यापारात त्याचा मोठा फटका बसला आहे याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला आहे. ट्रम्प यांची पहिली भारत भेट २४ व २५ फेब्रुवारी रोजी होणार असून ते त्यांच्या पत्नी मेलानिया यांच्या समवेत अहमदाबाद, आग्रा व नवी दिल्ली येथे भेट देणार आहेत. अमेरिकी उत्पादनांना फायदा व्हावा यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याशी व्यापार चर्चा करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

कोलोरॅडो येथील ‘कीप अमेरिका ग्रेट’ मेळाव्यात त्यांनी सांगितले की, भारताशी व्यापारावर चर्चा होईल. त्यांनी आमच्या वस्तूंवर इतकी वर्षे बरेच कर लादले त्याचा आम्हाला व्यापारात आर्थिक फटका बसला आहे. मोदी मला खरोखर आवडतात, मी त्यांच्याशी व्यापारावर चर्चा करणार आहे. या दौऱ्यात व्यापार करार होण्याची शक्यता फेटाळताना त्यांनी म्हटले आहे की, दोन्ही देशांमध्ये मोठा व्यापार करार होऊ शकतो हे खरे आहे पण तो आताच्या दौऱ्यात अवघड आहे. व्यापार करारावर चर्चा सुरू झाल्या तरी जर अमेरिकेला फायदा होत नाही असे दिसले तर चर्चा पुढे जाणार नाही.

ट्रम्प यांची कन्या, जावयाचा उच्चस्तरीय शिष्टमंडळात समावेश

नवी दिल्ली : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत त्यांच्या कन्या इव्हान्का व जावई जॅरेड कुशनर हे भारत दौऱ्यावर येत असून उच्चस्तरीय शिष्टमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. २४ व २५ फेब्रुवारी रोजी त्यांचा हा पहिला भारत दौरा होत आहे. ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांचाही समावेश या शिष्टमंडळात असून अर्थमंत्री स्टीव्हन नुशिन, व्यापारमंत्री विल्बर रॉस हेही त्यांच्या समवेत राहणार आहेत. अमेरिकेने म्हटले आहे, इव्हान्का ट्रम्प व जॅरेड कुशनर हे उच्चस्तरीय शिष्टमंडळात असतील, कुशनर हे ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार आहेत. अमेरिकी अध्यक्षांचा हा दौरा ३६ तासांचा असून ते अहमदाबाद येथून आग्रा व नंतर दिल्लीला जाणार आहेत. दोन्ही देशांत दहशतवादविरोधी सहकार्य वाढवणे, इंडो-पॅसिफिक भागात सहकार्य वाढवणे, संरक्षण व व्यापार संबंध भक्कम करणे हे मुद्दे त्यात महत्त्वाचे आहेत. ट्रम्प व मोदी यांच्या चर्चेत एच १ बी व्हिसाचा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 3:11 am

Web Title: president donald trump now says 10 million people to welcome him in ahmedabad zws 70
Next Stories
1 प्रशिक्षणार्थी महिला कर्मचाऱ्यांची आक्षेपार्ह तपासणी
2 अमेरिका-तालिबान संभाव्य कराराकडे भारताचे लक्ष; ट्रम्प-मोदी यांच्यात चर्चेची शक्यता
3 रुग्णसेवेसाठी विवाह लांबणीवर टाकलेल्या चिनी डॉक्टरचा मृत्यू
Just Now!
X