News Flash

राष्ट्रपती निवडणुकीत राज्यातील एका मताचे मूल्य १७५

विद्यमान राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची मुदत जुलैमध्ये संपत आहे.

विद्यमान राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची मुदत जुलैमध्ये संपत आहे. जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होईल. देशातील सर्व खासदार व आमदार या निवडणुकीत मतदान करू शकतात. विधान परिषदेच्या आमदारांना मतदानाचा अधिकार नसतो. लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या खासदारांना मतदानाचा अधिकार असतो.

मतांचे मूल्य कशा प्रकारे निश्चित केले जाते?

लोकसभा आणि आमदारांच्या मतांचे मूल्य निश्चित असते. लोकसभेसाठी प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य हे ७०८ आहे. हे ७०८ मूल्य कशा प्रकारे निश्चित करण्यात आले ते असे. देशातील एकूण ४१२० विधानसभा सदस्यांचे एकूण मतांचे मूल्य हे ५,४९,४७४ आहे. लोकसभेचे ५४३ अधिक राज्यसभेचे २३३ असे एकूण ७७६ सदस्य होतात. आमदारांचे एकूण मतांचे मूल्य ५ लाख ४९ हजार ४७४ भागीले ७७६ अशा पद्धतीने खासदारांच्या मतांचे मूल्य हे ७०८ हे निश्चित झाले आहे.

प्रत्येक राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य कशा प्रकारे निश्चित केले जाते?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १९७१च्या जनगणनेच्या आधारे राज्यांची लोकसंख्या आधार मानली जाते. १९७१ची जनगणनेच्या आधारे लोकसंख्या भागीले राज्य विधानसभेची सदस्यसंख्या या आधारे मतांचे मूल्य निश्चित झाले आहे. १९७१च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या पाच कोटी, चार लाख अशी होती. म्हणजेच ५ कोटी चार लाख भागिले २८८ अशा आधारे मतांचे मूल्य निश्चित केले जाते. या भागाकारातून महाराष्ट्रातील प्रत्येक आमदारांच्या मतांचे मूल्य हे १७५ होते.

 प्रत्येक राज्याच्या मतांचे एकूण मूल्य कसे ठरते?

१९७१चा लोकसंख्या भागिले विधानसभेचे एकूण सदस्य यातून एका मताचे मू्ल्य निश्चित केले जाते. राज्यातील मतांचे एकूण मूल्य हे राज्य विधानसभेचे सदस्य गुणिले मतांचे मूल्य यातून मतांचे प्रमाण ठरते. म्हणजेच राज्यातील आमदारांच्या एका मताचे मूल्य हे १७५ आहे. राज्य विधानसभेचे संख्याबळ हे २८८ आहे. या आधारे २८८ गुणिले १७५ याची संख्या येते ५० हजार ४००. म्हणजेच महाराष्ट्रातील आमदारांच्या मतांचे प्रमाण हे ५०,४०० आहे.

अन्य राज्यांतील आमदारांच्या मतांचे मूल्य कसे आहे?

उत्तर प्रदेश (२०८), केरळ (१५२), मध्य प्रदेश (१३१), कर्नाटक (१३१), पंजाब (११६), बिहार (१७३), आंध्र प्रदेश (१४८), तेलंगणा स्वतंत्र राज्य झाल्याने मूल्य आता बदलेल. गुजरात (१४७), झारखंड (१७६), ओदिशा (१४९).

खासदार आणि आमदारांच्या मतांचे एकूण मूल्य किती होते?

देशातील ७७६ खासदारांच्या मतांचे मूल्य हे ५ लाख ४९ हजार ४०८ एवढे आहे. लोकसभेचे एकूण ५४३ खासदार असून गुणिले ७०८ (खासदाराच्या एका मताचे मूल्य) ही संख्या येते ३,८४,४४४. राज्यसभेचे २३३ गुणिले ७०८ = १,६४,९६४. लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची मतांची बेरीज केल्यावर अंतिम आकडा येतो ५,४९,४०८.

देशातील विधानसभा सदस्यांची एकूण मते किती?

  • देशातील ४१२० एकूण आमदारांच्या मतांचे मूल्य हे ५,४९,४७४ आहे.
  • राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण मतदार किती?
  • लोकसभा आणि राज्यसभेचे ७७६ खासदार आणि ४१२० आमदार हे मतदानास पात्र ठरतात.
  • खासदारांचे मतांचे एकूण मूल्य – ५,४९,४०८
  • आमदारांच्या मतांचे एकूण मूल्य – ५,४९,४७४

एकूण मतांचे मूल्य –

१० लाख, ९८ हजार, ८८२.

  • विजयासाठी किती मते आवश्यक असतात ?

एकूण मतांच्या ५० टक्के मते आवश्यक असतात.

  • उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील निर्विवाद यशाने भाजपला यश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला का?

होय. उत्तर प्रदेश, उत्तराखंडच्या विजयाने भाजपचे संख्याबळ वाढले आहे. भाजप किंवा एनडीएला विजयासाठी काही मतेच कमी पडत आहेत. बिजू जनता दल वा अण्णा द्रमूकच्या पाठिंब्याने भाजपचा राष्ट्रपतिपदाचा उमेदवार निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही.

  • उपराष्ट्रपतिपदाचे काय?

उपराष्ट्रपतिपदासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. तेथे भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने या पक्षाला काहीच अडचण येणार नाही.

 

संकलनसंतोष प्रधान

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2017 1:13 am

Web Title: president elections in india
Next Stories
1 गोव्याची लढाई सर्वोच्च न्यायालयात!
2 सोमालियात कारबॉम्ब स्फोटात ६ जण ठार
3 जेएनयूच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Just Now!
X