राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी एका दयेच्या अर्जावर निर्णय घेतला. राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे निर्णयास आलेला हा पहिलाच दयेचा अर्ज होता. खुनाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावलेल्या जगत राय याने त्याची फाशी रद्द व्हावी, यासाठी राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता. त्या अर्जावर निर्णय घेत कोविंद यांनी ही मागणी फेटाळून लावली आणि फाशीची शिक्षा कायम ठेवली.

बिहारमध्ये २००६ साली एकाच कुटुंबातील ६ जणांना गाढ झोपेत असताना जगत रायने जाळून ठार मारले होते. विजेंद्र महोता यांची पत्नी आणि त्यांची ५ अपत्ये अशा ६ जणांचा त्याने खून केला होता. विजेंद्र यांनी म्हैस चोरीचा आरोप करत जगत राय, वझीर राय आणि अजय राय या तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी विजेंद्र यांच्यावर रायने दबाव टाकला. पण विजेंद्र यांनी तक्रार मागे घेतली नाही. त्यामुळे रायने विजेंद्र यांचे घर पेटवून दिले. या आगीत त्या सहा जणांचा मृत्यू झाला, तर विजेंद्र यांचा भाजून काही दिवसांनी मृत्यू झाला.

या संदर्भात रायला पाच वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा रद्द करण्यात यावी, म्हणून जगत रायने राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता. मात्र हा अर्ज त्यांनी फेटाळला. यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे हा प्रकार ज्यावेळी बिहारच्या वैशाली जिल्ह्यात घडला, त्यावेळी कोविंद हे बिहारचे राज्यपाल होते.