राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संसदेच्या संयुक्त सत्रास सकाळी ११ वाजता सेंट्रल हॉलमध्ये संबोधित करणार आहेत. नव्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतात अशी परंपरा आहे. राष्ट्रपती आपल्या अभिभाषणात सरकारच्या आगामी योजना व धोरणं देशासमोर मांडतील.

याशिवाय अभिभाषणा दरम्यान राष्ट्रपती २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारताची रूपरेषा देखील देशासमोर मांडण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये कृषि, रोजगार, सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यासारखे मुद्दे समाविष्ट असतील. राष्ट्रपतींचे अभिभाषण झाल्यानंतर जवळपास अर्धा तासाने लोकसभा व राज्यसभेची पुन्हा एकत्रीत बैठक होईल. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज शुक्रवार पर्यंत स्थगित केले जाईल.

याशिवाय राज्यसभेचे सत्र आज सुरू होत आहे. तर लोकसभेचे सत्र १७ जून रोजी सुरू झालेले आहे. संसदेचे हे सत्र २६ जुलै पर्यंत चालेल. ४ जुलै रोजी अर्थ मंत्रालयाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल येईल. त्यानंतर ५ जुलै रोजी पहिल्यांदाच एक महिला अर्थ मंत्री अर्थसंकल्प सादर करतील. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना सायंकाळी ७ वाजता अशोका हॅाटेल येथे स्नेहभोजनास बोलावले आहे.