News Flash

पॅराडाइज पेपर्समध्ये जॉर्डनची राणी, कोलंबियाच्या अध्यक्षांचेही नाव

जॉर्डनची राणी नूर अल-हुसैन यांचे अ‍ॅपलबायकडे मिस जॉर्डन आणि मिस ब्राऊन या नावे खाते आहे.

नूर अल-हुसैन , यिल्दीरिम , जुआन सांतोस

‘दि इंडियन एक्स्प्रेस’ व ‘दि इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्स’ व जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ वृत्तपत्र यांनी उघड केलेल्या पॅराडाइज पेपर्स प्रकरणाने भारतासह जगभरातील राजकीय नेते, अभिनेत्यांची झोप उडविली आहे. कोलंबियाचे अध्यक्ष, जॉर्डनची राणी आणि तुर्कस्तानच्या पंतप्रधानांच्या कुटुंंबियांची करचुकवेगीरी उघड झाल्याने खळबळ माजली आहे.

तुर्कस्तानचे पंतप्रधान यिल्दीरिम यांच्या कुटुंबियांनी जहाज वाहतुकीच्या उद्योगातून बक्कळ पैसा कमावला आहे. एर्कम आणि बुलेंट या यिल्दीरिम पुत्रांनी माल्टा येथील दोन कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणू केली आहे. यापैकी हावके बे मरीन कं. लिमिटेड या कंपनीची २००४ मध्ये नोंदणी करण्यात आली तर दुसरी कंपनी ब्लॅक इगल मरीन कं. लिमिटेड या कंपनीची नोंदणी तीन वर्षांनंतर करण्यात आली होती. एर्कम हा दोन्ही कंपन्यांवर संचालक आहे आणि कंपनीचे सर्वाधिक समभागही त्याच्या नावावर आहेत.

तर जॉर्डनची राणी नूर अल-हुसैन यांचे अ‍ॅपलबायकडे मिस जॉर्डन आणि मिस ब्राऊन या नावे खाते आहे. त्यांनी जर्सीमध्ये नोंदणी केलेल्या दोन संस्थांद्वारे फायदा मिळविला आहे. यापैकी एका संस्थेची २०१५ मध्ये ४० दशलक्ष डॉलर्सची संपत्ती असल्याचे कागदपत्र सापडले आहेत. यातून मिळालेला पैसा नूर यांना मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्राझिलचे अर्थमंत्री हेन्रीक दी कंपॉस मेइरेल्लेस यांचेही नाव पॅराडाइज पेपर्समध्ये आले आहे. त्यांनी २००२ मध्ये अ‍ॅपलबायच्या मदतीने बम्युर्डा येथे सॅबेडोरिया संस्थेची स्थापना केली आहे. ब्राझिल सेंट्रल बँकेचे अध्यक्ष असताना मेइरेल्लेस ही संस्था चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या काळात या संस्थेला फार कमी निधी मिळाल्याचे दाखविण्यात आले आहे.

कोलंबियाचे अध्यक्ष जुआन मॅनुएल सांतोस यांनी कोलंबियाचे अर्थमंत्रीपद, परदेश व्यवहार मंत्रीपदही भूषविलेले आहे. करचुकवेगीरी करणाऱ्या नोव्हा होल्डिंग कंपनीमध्ये ते संचालक होते. तसेच या कंपनीच्या ग्लोबल एज्युकेशन ग्रुप ऑफ कोलंबियाचे ९० टक्के समभागही त्यांच्या मालकीचे आहेत.

अ‍ॅपलकडूनही करचोरी

सॅन फ्रान्सिस्को : अ‍ॅपल कंपनीने आपल्या परदेशातील संपत्तीमधील बहुतांश भाग आर्यलडहून करनंदनवन असलेल्या ब्रिटिश आइल येथे हलविला असल्याचे पॅराडाइज पेपर्सच्या दस्तऐवजाचा आढावा घेतला असताना आढळले आहे. परदेशातील संपत्तीमधील बहुतांश भाग करनंदनवन असलेल्या ब्रिटिश ऑइलमध्ये हलविण्यात आल्याच्या वृत्ताला कंपनीने ऑनलाइन दुजोरा दिला आहे. मात्र या कृतीमुळे अमेरिकेला देय असलेला कर कंपनीने कमी केलेला नाही अथवा चुकविलेलाही नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 3:44 am

Web Title: president of colombia queen of jordan and more names in paradise papers
Next Stories
1 पॅराडाइज घोटाळ्यात खेमका यांचा सन समूह आघाडीवर
2 स्वदेशी बनावटीच्या निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी
3 ‘इंडिगो’च्या कर्मचाऱ्यांकडून प्रवाशाला धक्काबुक्की; पाहा व्हिडिओ
Just Now!
X