भारतरत्न हा किताब मिळवलेल्या आणि गानसम्राज्ञी अशी ख्याती असलेल्या गायिका म्हणजे लता मंगेशकर. लतादीदींचा आज ८८ वा वाढदिवस. त्यांना वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवर व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्विटरवरुन लता मंगेशकरांना शुभेच्छा दिल्या. मात्र राष्ट्रपतींचे हे ट्विट अनेक नेटिझन्सना रूचले नाही. ज्यामुळे रामनाथ कोविंद यांना अनेक नेटिझन्सनी ट्रोल केले.

प्रेसिडंट ऑफ इंडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ‘नाईटेंगल ऑफ इंडिया’ वाढदिवसाच्या शुभेच्छा असा ट्विट करण्यात आला. ( Birthday wishes to “Nightingale of India” Lata Mangeshkarji. May her voice continue to be the melody and soul of our nation #PresidentKovind) ज्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली.

‘नाईटेंगल ऑफ इंडिया’ ही उपाधी सरोजिनी नायडू यांना देण्यात आली होती. त्याचमुळे गुगलचे स्क्रीन शॉट काढून राष्ट्रपतींना ट्विटरवर उत्तर देण्यात आले. तसेच राष्ट्रपतींना बहुदा इतिहास फारसा माहीत नसावा अशीही शक्यता काही नेटिझन्सनी उपस्थित केली.

लता मंगेशकर यांच्या आवाजाचे गारूड आजही भारतातील आबालवृद्धांच्या मनावर कायम आहे. त्यांनी हिंदी भाषेत १ हजारापेक्षा जास्त गाणी गायली आहेत. इतर ३६ भाषांमध्येही गाणी म्हटली आहेत. सचिन तेंडुलकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित अनेक दिग्गज व्यक्तींनी लतादीदींना शुभेच्छा दिल्या. मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ट्विटमुळे त्यांना ट्रोल व्हावे लागले.