माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर आपली अंतरिम पंतप्रधान होण्याची इच्छा होती, अशा प्रकारच्या चर्चेला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पूर्णविराम दिला आहे. अंतरिम पंतप्रधान बनण्याची आपली इच्छा होती ही चर्चा पूर्णपणे निराधार असून सूडबुद्धीने ती पसरविण्यात आल्याचेही मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
प्रणब मुखर्जी यांच्या ‘द टब्र्युलण्ट इयर्स : १९८०-९६’ या दीर्घ राजकीय कारकीर्दीतील आठवणींच्या दुसऱ्या खंडाचे प्रकाशन गुरुवारी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यामध्ये हे स्पष्टीकरण केले आहे. आपली अंतरिम पंतप्रधान बनण्याची इच्छा होती, आपण त्यासाठी दावाही केला होता अशा आशयाच्या अनेक गोष्टी तेव्हा पसरविण्यात आल्या होत्या, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
मात्र अशा प्रकारच्या गोष्टी पसरविण्यात आल्याने राजीव गांधी यांच्या मनात गैरसमज निर्माण झाला, मात्र या गोष्टी पूर्णपणे निराधार होत्या आणि त्या सूडबुद्धीने पसरविण्यात आल्या होत्या. रूपा प्रकाशनने सदर खंड प्रकाशित केला असून त्यामध्ये मुखर्जी यांनी पंतप्रधानपदाबाबत राजीव गांधी यांच्याशी न्हाणीघरात झालेले संभाषण सविस्तरपणे दिले आहे.
याबाबत आपल्याला राजीव गांधी यांच्याशी तातडीने चर्चा करावयाची होती त्यामुळे आपण राजीव आणि सोनिया यांच्याकडे गेलो व राजीव गांधी यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या खांद्याला हळू स्पर्श केला आणि तातडीचे काम असल्याचे सूचित केले. तेव्हा ते आपल्याशी बोलण्यासाठी वळले. संभाषणात कोणाचा व्यत्यय येऊ नये यासाठी राजीव गांधी यांनी आपल्याला न्हाणीघरात नेले, असे मुखर्जी यांनी म्हटले आहे.