X

संसदेत चर्चा व्हावी, गोंधळ नको

संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आणले आणून कामकाज विस्कळीत केले जाऊ नये

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे अभिभाषणात आवाहन; वादग्रस्त मुद्दय़ांना बगल दिल्याची विरोधकांची टीका

संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आणले आणून कामकाज विस्कळीत केले जाऊ नये; संसद ही लोकांच्या सर्वोच्च भावनांचे प्रतीक असून, या व्यासपीठावर चर्चा, विचारविनिमय झाला पाहिजे, गोंधळ होऊ नये, खासदारांनी या अधिवेशनात कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात केले. राष्ट्रपतींच्या भाषणात वेमुला आत्महत्या, जाट आरक्षण आंदोलन व जेएनयू वाद यांचा उल्लेखही नसल्याने डावे पक्ष, काँग्रेससह विरोधकांनी नापसंती व्यक्त केली आहे.

विरोधकांनी गेल्या अधिवेशनात राज्यसभेचे कामकाज बंद पाडून जीएसटीसह अनेक विधेयके रोखून सरकारला जेरीस आणले होते. सव्वा तासाच्या भाषणात मुखर्जी यांनी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्याचे आवाहन केले. खासदारांनी त्यांचे भाषण काळजीपूर्वक ऐकले. अधूनमधून बाके वाजवून प्रतिसादही दिला. सरकारच्या अनेक सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती त्यांनी दिली व  सरकारी बँकेचा कारभार सुधारण्यासाठी सरकार उपाययोजना करीत असल्याचे स्पष्ट केले. अन्न सुरक्षा, घरबांधणीवर सरकारचा भर असेल. त्याचबरोबर परदेशातील काळा पैसा भारतात आणण्याच्या प्रयत्नात यश येत आहे, प्रधानमंत्री जन धन योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून ही योजना दारिद्रय़निर्मूलनात महत्त्वाची आहे, या योजनेत २१ कोटी खाती उघडण्यात आली असून, त्यातील पंधरा कोटी चालू खाती आहेत व त्यात सरासरी ३२ हजार कोटी रुपये जमा आहेत, असे त्यांनी सांगितले.

परदेशातील मालमत्ता उघड न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा कायदा केल्याचे सांगून मुखर्जी म्हणाले की, पंतप्रधान मुद्रा योजनेत २.६ कोटी कर्जदारांना १ लाख कोटींचे वाटप करण्यात आले आहे, त्यात २.०७ कोटी लाभार्थी उद्योजक महिला आहेत.

पठाणकोटमध्ये झुंजणाऱ्या जवानांचे अभिनंदन

पाकिस्तानबाबत राष्ट्रपतींनी सांगितले की, सीमेपलीकडून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांचा खंबीरपणे मुकाबला केला जाईल व त्याचबरोबर पाकिस्तानशी परस्परसंबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. पठाणकोट हल्ला हाणून पाडणाऱ्या जवानांचे त्यांनी अभिनंदन केले. दहशतवादाविरोधात कठोर व खंबीर पावले उचलली जातील, असे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले.

  • Tags: budget-session, president-pranab-mukherjee,