काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पटेल यांच्या जाण्यानं काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. पटेल यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनीही अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधानाने दु:ख झाल्याचं म्हटलं आहे. ते एक उत्तम खासदार होते असंही राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. उत्तम गुण आणि नेतृत्वाचे ते अगदी योग्य उदाहरण होते. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे प्रत्येक पक्षात मित्र होते. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपण एक चांगला मित्र, सहकारी आणि कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटवरुन अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी समाजाच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं. ते त्यांच्या तल्लख बुद्धीसाठी ओळखले जायचे. काँग्रेसला शक्तीशाली पक्ष म्हणून उभं करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायमच लक्षात राहिलं असंही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अहमद भाईंच्या आत्म्याला शांती लाभो, असं मोदींनी ट्विटच्या शेवटी म्हटलं आहे.

अहमद पटेल यांच्या निधनाचं वृत्त कळताच काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “अहमद पटेल पक्षाचा एक स्तंभ होते. ते संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये जगले. जेव्हा काँग्रेस पक्ष खडतर काळातून जात होता, तेव्हाही ते पक्षासोबत उभे राहिले. ते एखाद्या मौल्यवान संपत्तीसारखे होते. आम्हाला सदैव त्यांची उणीव जाणवत राहिल. या दुःखाच्या प्रसंगी फैजल, मुमताज आणि संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या सहवेदना आहेत,” असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

प्रियंका गांधी यांनी अहमद पटेल यांच्या मृत्यूमुळे कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

याचबरोबर इतर अनेक नेत्यांनी अहमद पटेल यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे.

अशोक गेहलोत

राजीव सातव

मल्लिकार्जून खर्गे

कपील सिब्बल

मनिष तिवारी

अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनीच ट्विट करून पटेल यांच्या निधनाची माहिती दिली. “जड अंतःकरणाने माझे वडील अहमद पटेल यांचं निधन झाल्याची घोषणा करावी लागत आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ३.३० वाजता आपल्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. जवळपास एका महिन्यापूर्वी त्यांना करोना झाल्याचं निदान झालं होतं. उपचारादरम्यान त्यांच्या शरीराच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. एकाच वेळी अनेक अवयव निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गुरूग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो. मी सगळ्यांना आवाहन करतो की, गर्दी ठिकाणी जाणं टाळून करोना नियमांचं पालन करा. नेहमी सोशल डिस्टन्सिगचं पालन करा,” असं फैजल पटेल यांनी म्हटलं आहे. अहमद पटेल यांनी १ ऑक्टोबरला स्वतः ट्विट करून करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.