नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्याने तसेच राज्याचे विभाजन झाल्याने स्थानिक नागरिकांनाच मोठा लाभ होणार असून त्यांचा वेगाने विकास होईल, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केले.स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात कोविंद म्हणाले की, देशवासियांना ज्या सोयीसुविधांचा लाभ होतो त्यांचा लाभ आता जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील जनतेलाही घेता येणार आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी अनंत परिश्रम केले, लढे उभारले त्यांची स्वातंत्र्याची व्याख्या केवळ राजकीय सत्तेचे हस्तांतरण, अशी संकुचित नव्हती. देश उभारणीच्या दीर्घ आणि व्यापक प्रक्रियेतील ते एक महत्त्वाचे पाऊल होते. त्यांचे खरे ध्येय हे प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा विकास आणि त्यायोगे समाजाचा विकास हेच होते. तोंडी तलाकविरोधातील कायद्यासारखे नवे कायदे हे त्याच हेतूने केले गेले आहेत, असेही कोविंद म्हणाले.