स्वातंत्र्यदिवसाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी नाव न घेता चीनला कठोर शब्दात संदेश दिला. “जर कोणीही अशांतता परसवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल,” असं ते म्हणाले. “यावर्षी दरवर्षीप्रमाणे स्वातंत्रदिनाचा सोहळा मोठ्या पद्धतीनं साजरा केला जाणार नाही. याचं कारणं स्पष्ट आहे. संपूर्ण जग अशा विषाणूचा सामना करत आहे ज्यानं आज सर्व जनजीवन विस्कळीत केलं आहे. तसंच सर्वप्रकारच्या कामांमध्ये अडथळा निर्माण केला आहे,” असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी भारत चीन सीमावादाचाही उल्लेख केला. “आज जेव्हा संपूर्ण जगासमोर एक सर्वात मोठं आव्हान उभं ठाकलं आहे, त्यावेळी सर्वांना त्याचा एकत्रित सामना करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आपल्या शेजारी राष्ट्रानं त्यांच्या विस्तारवादी भूमिकेचा अवलंबक करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या सीमेचं संरक्षण करणाऱ्या आपल्या जवानांनी यासाठी हौतात्म्य पत्करलं,” असंही राष्ट्रपती म्हणाले. भारतमातेच्या त्या सुपुत्रांनी देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. संपूर्ण देश गलवान खोऱ्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना नमन करतो. प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती आदराची भावना आहे. जर कोणीही अशांतता पसरवण्याचं काम केलं तर त्यांना योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल हे आपण दाखवून दिल्याचंही ते म्हणाले. “आपल्या सीमेचे रक्षण करणारे आणि अंतर्गत सुरक्षेसाठी झटणाऱ्यासैन्य दल, पोलीस आणि निमलष्करी दलांचा आम्हाला अभिमान आहे.” असंही कोविंद यावेळी म्हणाले.

 

राम मंदिराच्या उभारणीला सुरूवात

“केवळ दहा दिवसांपूर्वीच राम मंदिराच्या उभारणीच्या कामाचा शुभारंभ झावा आणि ही देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. देशवासीयांनी मोठ्या कालावधीसाठी धैर्य आणि संयम बाळगला आणि देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला. श्रीराम जन्मभूमीशी संबंधित प्रकरण योग्य न्याय प्रक्रियेअंतर्गतच सोडवण्यात आलं. सर्वांनी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा सन्मानानं स्वीकार केला. शांती, अहिंसा आणि प्रम भावनेचं उदाहरण संपूर्ण जगासमोर आणलं. यासाठी सर्वांचंच मी अभिनंदन करतो,” असंही ते म्हणाले.

जगासमोर उदाहरण

“करोनासारख्या महामारीवर नियंत्रण ठेवणं आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या जीवनाचं रक्षण करण्यात आपल्याला यश मिळालं आहे आणि संपूर्ण जगासमोर एक उदाहरण आहे. मोठी लोकसंख्या असेलेल्या देशात या आव्हानाचा आपण सामना करत आहोत. राज्य सरकारांनीदेखील स्थानिक परिस्थितीनुसार यावर उपाययोजना केल्या. त्यांना जनतेनंही सहकार्य केलं,” असंही कोविंद यांनी नमूद केलं. येणाऱ्या आव्हानाकडे पाहता त्याला थोपवण्यासाठी केंद्र सरकारनं वेळीचं मोठी पावलं उचलली होती. करोना महामारीचा सर्वाधिक परिणाम गरीब आणि दैनंदिन रोजगारावर काम करणाऱ्यांवर सर्वाधिक झाला आहे. संकटाच्या या कालावधीत त्यांना मदत करण्याचं तसंच विषाणूला रोखण्यासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी योग्य ती पावलं उचलली असल्याचेही ते म्हणाले.