आम्हाला असा भारत घडवायचा आहे जो जगाचे आर्थिक नेतृत्व करेल. मला पूर्ण विश्वास आहे की, हे शतक भारताचे असेल. देशातील प्रत्येक नागरिकाचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. सरन्यायाधीश जे.एस.केहर यांच्याकडून शपथ घेतल्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले. ते म्हणाले, देशाच्या सीमेचे संरक्षण करणारे, आम्हाला सुरक्षित ठेवणारे राष्ट्र निर्माता आहेत. देशातील शेतकरी राष्ट्र निर्माता आहे, रोजगार देणारा, स्टार्टअप सुरू करणारा प्रत्येक युवक राष्ट्र निर्माता आहे, असे म्हणत देशातील सर्वसामान्य नागरिकच राष्ट्र निर्माता असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

तत्पूर्वी त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगत मी एका छोट्या गावातून आलो असून मातीच्या घरात माझे पालनपोषण झाल्याचे सांगितले. आपल्याला महात्मा गांधी आणि दीनदयाल उपाध्याय यांच्या स्वप्नातील भारत घडवायचा आहे. आम्ही सर्व एक असून एकच राहणार असल्याचे ते म्हणाले. विविधता ही आमच्या देशातील ताकद आहे. आज संपूर्ण जगात भारताचे महत्व वाढले आहे. संपूर्ण जग आमच्याकडे आशेने पाहत आहे, असे ते म्हणाले. देशातील आदिवासी जो आपल्या पर्यावरणाचे रक्षण करतो तोही एक राष्ट्र निर्माता असल्याचे ते म्हणाले. राष्ट्र निर्माणाचा आधार हा राष्ट्रीय गौरव असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, सरन्यायाधीश जे.एस.केहर यांनी कोविंद यांना शपथ दिली. कोविंद यांनी हिंदीतून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर लष्कराकडून २१ तोफांची मानंवदना देण्यात आली. सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतल्यानंतर कोविंद हे राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले. तिथे त्यांना लष्कराच्या तिन्ही दलांकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आले.