श्रीनगर : कारगिल विजयाच्या २०व्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी लष्कराच्या १५ कॉर्पस मुख्यालयातील युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून या युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. काश्मीरच्या बदामी बाग लष्करी भागात हे युद्धस्मारक आहे. नियोजित कार्यक्रमानुसार कोविंद हे द्रास येथील युद्धस्मारकावर सकाळी झालेल्या कार्यक्रमात सहभागी होणार होते; पण खराब हवामानामुळे ते तेथे पोहोचू शकले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  लष्कराच्या १५ कॉर्पस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमास राष्ट्रपती कोविंद यांच्यासोबत जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक उपस्थित होते.

कारगिल विजयाच्या या स्मृतिदिनानिमित्त मी या महान देशातर्फे कारगिलमधील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहत आहे. आज आम्हाला आमच्या शूरवीर जवानांच्या पराक्रमाचे स्मरण होत आहे. त्यांच्या विजयाचा उत्सव साजरा करतानाच या महान देशाच्या सेवेसाठी आम्ही पुन्हा वचनबद्ध होत आहोत.

रामनाथ कोविंद, राष्ट्रपती