News Flash

दिल्ली : राष्ट्रपतींनी घेतला करोना लसीचा पहिला डोस

एक मार्चपासून व्यापक लसीकरणाची झालीय सुरुवात

(फोटो सौजन्य : एएनआय)

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिल्लीमध्ये करोना लसीचा पहिला डोस घेतला. राष्ट्रतींनी नवी दिल्लीमधील आर्मी हॉस्पीटल रिसर्च अ‍ॅण्ड रेफ्रल म्हणजेच आर. आर. रुग्णालयामध्ये करोनाची लस घेतली. एक मार्चपासून देशामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यामध्ये ज्येष्ठांसह (६० वर्षांवरील) सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना सरकारी रुग्णालयांत मोफत लस देण्यात येणार असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. याच तिसऱ्या टप्प्यामध्ये ७५ वर्षीय कोविंद यांनी आज लसीचा पहिला डोस घेतला आहे.

देशामध्ये ५० लाखांहून अधिक पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. यापैकी सहा लाख ४४ हजार नागरिकांना पहिल्या दिवशी वेळ देण्यात आला. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच राष्ट्रावादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यासारख्या नेत्यांनीही लस घेतली. मोदींनी भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’चा डोस घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासहीत अन्य काही केंद्रीय मंत्र्यांनी लस घेतली.

लसीकरण मोहीमेच्या या टप्प्यात आमदार, खासदारांचाही समावेश करण्यात आला आहे. लशींवर आक्षेप घेण्यापेक्षा विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव तसेच, अन्य विरोधी पक्षनेत्यांनी लशींच्या सुरक्षिततेबाबत शंका घेतली होती. राज्यसभेतील नवनियुक्त विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तातडीने लसीकरण करण्यास नकार दिला असून तरुणांनी आधी लसीकरण केले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.

देशात लसीकरणाचा पहिला टप्पा १६ जानेवारी रोजी सुरू झाला होता. पहिल्या टप्प्यात आघाडीवरील करोनायोद्धय़ांच्या लसीकरणासाठी सीरम संस्थेने उत्पादित केलेली ‘ऑक्सफर्ड’ची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लशी वापरल्या गेल्या. पहिल्या टप्प्यात दोन्ही लशींच्या परिणामकारकतेबाबत शंका घेतल्या गेल्या होत्या. तिसरी चाचणी न झालेल्या देशी ‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या वापरास परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारवर टीकाही झाली होती. दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी व्यवस्थापनाला पत्र लिहून आक्षेप नोंदवले होते. दोन्ही लशी सुरक्षित असल्याचे मी पहिल्यापासून सांगत होतो, परंतु आपण आपल्या कृतीतून लोकांना उदाहरण घालून दिले पाहिजे, असे मोदी आम्हाला नेहमी सांगत असतात. त्यांनी ते करून दाखवले, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 1:47 pm

Web Title: president ram nath kovind receives first dose of covid19 vaccine at rr hospital scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सरकारपेक्षा भिन्न मत व्यक्त करणं म्हणजे देशद्रोह नाही- सुप्रीम कोर्ट
2 पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये ‘दादा’ची राजकीय इनिंग सुरू होणार? बंगाल भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणतात…
3 कर्नाटकमधील येडियुरप्पा सरकारसमोर नवं संकट; Sex CD प्रकरणात अडकले जलसंवर्धन मंत्री
Just Now!
X