दुधातील भेसळ अवघ्या एका मिनिटात ओळखणाऱ्या उपकरणाचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. या उपकरणाचा वापर अतिशय सोपा असून त्यामुळे दुधातील भेसळ ओळखण्यास मोलाची मदत होणार आहे. ‘पब्लिक सेक्टर रिसर्च बॉडी काऊन्सिल ऑफ सायन्टिफीक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च’ म्हणजेच ‘सीएसआयआर’ने या उपकरणाची निर्मिती केली आहे.

‘सीएसआयआर’ने तयार केलेल्या उपयुक्त उपकरणाच्या अनावरणप्रसंगी रामनाथ कोविंद यांच्यासोबत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन उपस्थित होते. या उपकरणाला ‘शीर टेस्टर’ असे नाव देण्यात आले आहे. या लहानशा उपकरणामुळे दुधातील युरिया, मीठ, डिटर्जंट, साबण, सोडा, बोरिक अॅसिड, हायड्रोजन पॅरॉक्साईड या घटकांची भेसळ ओळखता येते. वापरकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या या उपकरणाची किंमत ५ हजार रुपये आहे. एक बटण दाबताच अवघ्या ६० सेकंदांमध्ये हे उपकरण दूध भेसळयुक्त आहे की नाही, याची पडताळणी करते.

यावेळी राष्ट्रपतींनी आणखी एका नव्या तंत्रज्ञानाचे अनावरण केले. या तंत्रज्ञानाचा वापर जनावरांच्या कातडीवर प्रक्रिया करण्यासाठी केला जाईल. ‘सीएसआयआर’च्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोविंद यांनी देशभरातील वैज्ञानिकांना संबोधित केले. ‘नवे तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित उपकरणांची निर्मिती करताना मूलभूत संशोधनापासून लक्ष विचलित होऊ देऊ नका,’ असे आवाहन यावेळी त्यांनी केले. मूलभूत विज्ञान संशोधन अतिशय महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी म्हटले.

दोन नव्या तंत्रज्ञानांचे अनावरण करताना राष्ट्रपतींनी ‘सीएसआयआर’चे कौतुक केले. ”सीएसआयआर’च्या संशोधनातून आकाराला आलेल्या तंत्रज्ञानाचा समाजाला मोठा फायदा होईल. त्यामुळेच या तंत्रज्ञानांचे अनावरण करताना मला अतिशय आनंद होत आहे,’ अशा शब्दांमध्ये राष्ट्रपतींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.