राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन; गोएंका पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

नागरिकांना परिपूर्ण माहिती मिळाली तरच लोकशाही व्यवस्था अर्थपूर्ण बनते. उत्कृष्ट पत्रकारितेमुळे लोकशाहीला पूर्णत्व प्राप्त होते, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी केले. रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार समारंभात प्रमुख पाहुणे ते बोलत होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील ११ वर्गवारींमधील २३ विजेत्यांना २०१८ सालातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान केले. यावेळी राष्ट्रपतींनी माध्यमे आणि लोकशाहीतील वादविवादाचे महत्त्व अधोरेखित केले. सत्याचा शोध अर्थातच कठीण असतो आणि बोलण्यापेक्षा तसे करणे कठीण असते; पण तरीही त्याचा पाठपुरावा करायलाच हवा, असे राष्ट्रपती कोविंद म्हणाले.

‘फेक न्यूज’ आणि ‘पेड न्यूज’ यांच्यामुळे निर्माण झालेल्या धोक्यांबद्दलही राष्ट्रपतींनी सावधगिरीचा इशारा दिला. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या कल्लोळात संयम आणि जबाबदारीच्या मूलभूत तत्त्वाकडे मोठय़ा प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे. खोटय़ा बातम्यांचे नवे संकट निर्माण झाले आहे. त्या पसरवणारे लोक स्वत:ला पत्रकार म्हणवून घेत असून, या उदात्त व्यवसायाला कलंक लावत आहेत, असे कोविंद म्हणाले. तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरूप आमूलाग्र बदलले आहे. याशिवाय, यामुळे वस्तुस्थिती व मतांतरे आणि विश्वासार्हता व अधिकृतता याबाबतच्या जुन्या चर्चाना उजाळा मिळाला आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. यावेळी एक्स्प्रेस समूहाचे अध्यक्ष विवेक गोएंका यांनी कानपूरमधील कायद्याचा विद्यार्थी ते राष्ट्रपतीपदापर्यंतच्या कोविंद यांच्या गेल्या ४० वर्षांतील प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे मुख्य संपादक राजकमल झा यांनी यावेळी पुरस्कारप्राप्त बातम्यांचा वेध घेतला. एक्स्प्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी राष्ट्रपती कोविंद यांना सुरजित डे यांनी काढलेले त्यांचे चित्र भेट दिले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, जदयूचे नेते के. सी. त्यागी, भाकप नेते डी. राजा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

‘कालसुसंगत पत्रकारितेसाठी..’ पत्रकारिता कालसुसंगत ठरण्यासाठी प्रामाणिकपणा आणि निष्पक्षता ही मूल्ये पुनस्र्थापित करावी लागतील. सत्यासाठी नेहमीच लढू, काहीही परिणाम झाले तरी वाकणार नाही. भय किंवा पक्षपाताशिवाय सत्य शोधण्याशी बांधील राहण्याची भूमिका माध्यमांनी घ्यायला हवी, अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.